सामाजिक न्यायाचा पाया भक्कम करणारा अर्थसंकल्प : ॲड. धर्मपाल मेश्राम

    23-Jul-2024
Total Views |
Nirmala Sitharaman
(Image Source : Internet) 
नागपूर :
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला मजबूत विकास आणि सर्वांगीण समृद्धीच्या मार्गावर नेणारा अर्थसंकल्प ठरला आहे. या अर्थसंकल्पातून अनुसूचित जाती, जमाती आणि देशातील वंचितांना कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शक्ती प्रदान करून सामाजिक न्यायाचा पाया अधिक भक्कम होणार आहे, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.
 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गाच्या उत्थानासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल ॲड. मेश्राम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले.
 
अर्थसंकल्पात सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागासाठी १३,५३९ रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. ही मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत ३७ टक्क्यांची भरीव वाढ आहे. या वाढीमुळे देशातील उपेक्षित समुदायांकरिता कल्याणकारी कार्यक्रम राबवून त्यांना सुविधा प्रदान करण्यास मदत होईल, असा विश्वास ॲड. मेश्राम यांनी व्यक्त केला. अनुसूचित जातीसाठी मोदी सरकारच्या मागील कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या ‘अम्ब्रेला’ योजनेला अधिक सशक्त करण्यात आले आहे.
 
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला ३८ कोटी रुपये आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला २१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय विमुक्त, भटक्या समुदायासाठी अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद आहे. सामाजिक न्यायाच्या माध्यमातून वंचित आणि उपेक्षित समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. आदिवासी, दलित-मागास समुदायाला अधिक सशक्त करण्याच्या योजना अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या आहेत, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.