धामणगाव मतदारसंघात शिवसंवाद सप्ताह

    22-Jul-2024
Total Views |
- विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
 
- अभिजित ढेपे यांची पत्रकार परिषद
 
Uddhav Thakre
(Image Source : Internet) 
अमरावती :
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलैदरम्यान धामणगावरेल्वे मतदारसंघात शिवसंवाद सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत मतदारसंघात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम, बचतगटांसाठी प्रदर्शन आदी उपक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, धामणगावरेल्वे मतदारसंघातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांमध्ये लाडकी बहीण योजनेकरिता महिलांचे मोफत खाते उघडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते अभिजित ढेपे यांनी दिली.
 
धामणगावरेल्वे मतदारसंघातील धामणगाव, चांदूररेल्वे तसेच नांदगाव खंडेश्वर या तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांचा शिवसेनेच्या वतीने मोफत विमा काढला जाणार आहे. बचतगटातील महिलांकडून निर्मित साहित्याच्या विक्रीसाठी बचतगट वस्तू प्रदर्शनसुद्धा आयोजित करण्यात येणार आहे. याप्रसंगी विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश होणार असल्याचा दावा अभिजित ढेपे यांनी केला. पत्रपरिषदेला जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, नांदगाव खंडेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद कोहळे, राजेश पांडे, गजानन खोंडे, युवासेनेचे स्वराज ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
विधानसभेच्या पाच मतदारसंघांवर दावा
 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्य वतीने (उबाठा) तयारी सुरू करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील आठ पैकी मेळघाट, धामणगावरेल्वे, दर्यापूर, बडनेरा तसेच मोर्शी या मतदारसंघावर आमचा दावा असल्याचे जिल्हा संपर्क प्रमख सुधीर सूर्यवंशी यांनी सांगितले.