चांदुर बाजार तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी

    22-Jul-2024
Total Views |
- अनेक नाल्यांना पूर, अनेकांच्या घरात शिरले पाणी
 
Chandur Bazar
(Image Source : Internet)
चांदुर बाजार:
गेल्या दोन दिवसात तालुक्यात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली. दुसरीकडे अनेक नाले दुधळी वाहत असल्याने या नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचा प्रकार समोर आला.
 
तालुक्यातील चांदुर बाजार स्थित चिलाती नाल्याला पूर आल्याने इंदिरा नगर तसेच नाल्या काठी असलेल्या घरात पाणी शिरले. तिकडे ब्राम्हणवाडा थडी येथील मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहताना पाहायला मिळाले. शिरजगाव कसबा, या ठिकाणी देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर तालुक्यातील माधान या गावातील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने वाहतूक जसापूर मार्गे करण्यात आली.माधान येथील रोशन पगारे, ज्ञानेश्वर वानखडे, संदीप डोक, जोशना शर्मा, मनोज धावडे, गंगा जवंजाळ, रमेश पवार, राम शर्मा यांच्या घरात पाणी शिरले. तर सर्वाधिक पाऊस हा ब्राम्हणवाडा थडी महसूल मंडळात 82.7 टक्के इतका झाला.
 
नाल्याच्या पुरांमुळे पूर्णा आणि मेघा दुथळी वाहत होती. तर चिलाटीच्या नाल्याला देखील मोठया प्रमाणात पाऊस आल्याने देऊरवाडा येथील बस स्थानक समोर पाणी पहायला मिळाले. सोनोरी येथे एका शेतक:याच्या शेतात पाणी साचलेल्या शेती खरडून गेली. तालुक्यातील देऊरवाडा या ठिकाणी असलेल्या महानुभाव आश्रम राहत असलेल्या वृध्देची प्रकृती बिघडल्याने तिला दवाखान्यात पुला अभावी बैलगाडी न्यावे लागले. अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. मात्र अजूनही काम सुरू झाले नाही.
 
माधान येथे 19 जुलै रोजी पावसामुळे नाल्याला पूर आला. त्यामूळे नाल्याच्या काठावरील अतिक्रमित अंदाजे 7 ते 8 घरांमध्ये पाणी शिरले. हे पाणी घराच्या आवारात व काही अंशी घरामध्ये शिरले होते, पाण्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या लोकांची राहण्याची पर्यायी व्यवस्था अहिल्याबाई होळकर सभागृहात करण्यात आली, परंतु पाणी ओसरल्यामुळे लोकांनी स्थलांतरित होण्यास नकार दिला, असे चांदूर बाजारचे निवासी नायब तहसीलदार राजेश चौधरी यांनी सांगितले.