महान पार्श्वगायक मुकेश यांची आज जयंती!

    22-Jul-2024
Total Views |

great playback singer mukesh(Image Source : Internet) 
 
 
हिंदी चित्रपट सृष्टीतील महान पार्श्वगायक मुकेश यांची आज जयंती. आजच्याच दिवशी म्हणजे २२ जुलै १९२३ रोजी मुकेश यांचा जन्म झाला. मुकेश यांचे संपूर्ण नाव मुकेश चंद माथूर असे होते. दिल्लीतील दारियागंज आणि चांदणी चौकात त्यांचे बालपण गेले. त्यांच्या वडिलांचे नाव जोरावर चंद माथूर असे होते. ते इंजिनिअर होते, तर आई राणी या गृहिणी होत्या. मुकेश यांना बालपणापासून संगीताची आवड होती. त्याकाळातील प्रख्यात गायक कुंदनलाल सहगल यांचे ते प्रशंसक होते. त्यांनाही कुंदनलाल सहगल यांच्याप्रमाणे अभिनेता व गायक व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी लहान वयातच त्यांची संगीताचे प्राथमिक धडे गिरवले.
 
त्याकाळातील गाजलेले अभिनेते मोतीलाल यांनी मुकेश यांना त्यांच्या दूरच्या बहिणीच्या लग्नात गाताना पाहिले. मुकेश यांचा आवाज ऐकता क्षणीच ते त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले. एक दिवस हा आवाज हिंदी चित्रपट सृष्टिचा आवाज बनेल, असे ते त्यांच्या आई वडिलांना म्हणाले. त्यांनी मुकेश यांना मुंबईत आणले आणि गायक पंडित जगन्नाथ यांच्याकडून गायनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यास सांगितले. त्यांनीही गायनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. या दरम्यान त्यांना काही चित्रपटात अभिनयाच्या ऑफर्स आल्या. मुकेश यांचा राजबिंडा चेहरा आणि स्मितहास्य यामुळे त्यांना थेट नायकाच्या भूमिका मिळाल्या.
 
१९४१ साली 'निर्दोष' या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. त्यानंतर ४-५ चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. मात्र त्यांनी अभिनय केलेले चित्रपट काही विशेष चालले नाही. त्यामुळे नायक बनण्याचे आपले स्वप्न बाजूला ठेवून त्यांनी गायनावर लक्ष केंद्रित केले. गायक म्हणून मुकेश यांना पहिला ब्रेक मिळाला तो १९४५ साली आलेल्या पहिली नजर या चित्रपटात. या चित्रपटात त्यांनी गायलेले 'दिल जलता है तो जलने दो' हे गीत खूप लोकप्रिय झाले. या गीतामुळे चित्रपट सृष्टित त्यांची ओळख निर्माण झाली. या गाण्यावर कुंदनलाल सहगल यांच्या शैलीचा प्रभाव होता. १९५८ साली आलेल्या 'यहुदी' या चित्रपटातील 'ये मेरा दिवानापन है' हे गाणे देखील खूप गाजले. या गाण्याद्वारे त्यांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आणि कुंदनलाल सहगल यांच्या प्रभावातून ते बाहेर पडले. त्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टित मुकेश युग सुरू झाले. त्यांनी अनुनासिक शैलीत गायलेले गाणे हिट होऊ लागले. 'मेला' आणि 'अंदाज' या चित्रपटात त्यांनी गायलेले सर्व गाणी लोकप्रिय झाले.
 
अंदाज हिट झाल्यानंतर मुकेश रणजित नावाच्या स्टुडिओत गायनाचा रियाज करीत होते, तेव्हा तिथे एक देखणा तरुण आला आणि म्हणाला किती भावनाप्रधान आहे तुझा आवाज. मला तुझा आवाज खूप आवडतो. तो तरुण होता राज कपूर. पुढे राज कपूर आणि मुकेश हे हिंदी चित्रपट सृष्टीतील यशाचे समीकरण बनले. या जोडीने अनेक हिट गाणी दिले. आग, आवरा, श्री ४२०, बरसात, परवरिश, अनाडी, संगम, मेरा नाम जोकर या आर. के. बॅनरच्या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेली सर्व गाणी गाजली. राज कपूर यांचा आवाज अशीच मुकेश यांची ओळख निर्माण झाली. राज कपूर यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटातल्या गाण्याचे रेकॉर्डिंग करून ते अमेरिकेला गेले होते.
 
डेट्रॉय मिशिगन मध्ये २७ ऑगस्ट १९७६ रोजी ते लवकर उठून अंघोळीसाठी गेले असता अचानक त्यांच्या छातीत कळ आली आणि त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनानंतर राज कपूर यांनी आज माझा आवाज कायमचा हरपला! अशी प्रतिक्रिया दिली. मुकेश यांनी ३ दशकांहून अधिक काळ आपल्या अनोख्या गायन शैलीने रसिकांवर मोहिनी घातली. मुकेश यांचा दर्दभरा आवाज रसिकांच्या मनावर कायमचा कोरला गेला. आज इतक्या वर्षानीही त्यांचा दर्दभरा आवाज रसिकांना मोहित करतो. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. रजनिगंधा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर ४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र ते रसिकांच्या मनात त्यांचे जे स्थान आहे, त्याला सर्व पुरस्काराहून श्रेष्ठ आहे मानत. त्यांच्यासारखा महान पार्श्वगायक पुन्हा होणार नाही. जयंतीदिनी मुकेश यांना भावपूर्ण आदरांजली!
 
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.