अध्यात्म, विज्ञान, आत्मज्ञान यांचा समन्वय आवश्यक

    22-Jul-2024
Total Views |
 - डॉ. वि. स. जोग यांचे प्रतिपादन
- पत्रभेटच्या रौप्यमहोत्सवानिमित्त परिसंवाद

jog 
 नागपूर :
व्यक्तिगत जीवनात अध्यात्म आवश्य असते. अन्यथा वैचारिक कंगाली येण्याचा धोका असतो. त्यामुळे अध्यात्म, विज्ञान आणि आत्मज्ञान यांचा योग्य समन्वय राखल्यास या क्षेत्रात उंची गाठणे शक्य होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समिक्षक आणि साहित्यिक डॉ. वि. स. जोग यांनी केले. पत्रभेट-भेट सद्गुरूंशी या आध्यात्मिक मासिकाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जयप्रकाशनगर येथील ठेंगडी सभागृहात शनिवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
 
ते पुढे म्हणाले, पत्रभेट हे आध्यात्मिक मासिक नसून सर्वसमावेशक लिखाण, मार्गदर्शन यातून होते. विशेष म्हणजे या मासिकाचे मार्गदर्शक धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांचे लिखाणाची वैचारिक बैठक हे पत्रभेटचे अधिष्ठान आहे, असेही डॉ. जोग यांनी यावेळी सांगितले.
 
या कार्यक्रमाला धर्मभास्कर सद्गुरुदास महाराजांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक डॉ. वि. स. जोग, तसेच पत्रभेट मासिकाचे पुणे येथील संपादक स्मिता काटेकर, सुप्रसिद्ध साहित्यिक व स्तंभलेखिका डॉ. प्रज्ञा पुसदकर, सुप्रसिद्ध कीर्तनकार मोहनबुवा कुबेर आणि वणीचे सुप्रसिद्ध गाणपत्य विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड, पत्रभेटच्या संपादिका स्मिता काटेकर या मान्यवरांनी विष्णुदास महाराजांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन केले. सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात पत्रभेट या आध्यात्मिक मासिकाची आवश्यकता हा परिसंवादाचा विषय होता.
 
पत्रभेटची वाटचाल या विषयावर बोलताना मासिकाच्या संपादिका स्मिता काटेकर यांनी ‘व्यासाय विष्णुरूपाय व्यास रुपाय विष्णवे’- हा श्लोक म्हणून विष्णुदास महाराज, सद्गुरुदास महाराज यांचे आध्यात्मिक विचार लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून पत्रभेटचे निर्माण झाले. डॉ. प्रज्ञा पुसदकर यांनी, आधुनिक युगात आपल्याला मोबाईलद्वारे ज्ञान मिळतं. परंतु ग्रंथांमधून मिळणारं ज्ञान टिकणारं असतं. आध्यात्मिक विचार देणारं पत्रभेट हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे, असे सांगितले. मोहनबुवा कुबेर यांनी, सद्गुरूंचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे साधन म्हणजे पत्रभेट असल्याचे सांगितले. ज्ञानाकरिता माध्यम अत्यंत पवित्र, शुचिपूर्ण असले पाहिजे, असे ते म्हणाले.
 
यावेळी स्वानंद पुंड यांनी, माझ्या आनंदाचे विषय मोठे झाले की नाही ते तपासले तर आपण मोठे झालो असे समजा. जीवनात पत्रभेट किती उतरली आहे हे महत्त्वाचे. जीवनात येणार्‍या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणे म्हणजे अध्यात्म. माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण मला आनंदाने जगायचा आहे, असा निश्चय करा ही बाब पत्रभेटच्या माध्यमातून शिकवण मिळत असल्याचे विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी सांगितले.
 
परिसंवादाची संकल्पना अजय देशमुख यांची होती. कार्यक्रमाचे संचालन संजीवनी अगस्ती यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अमर देशपांडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शिष्यवर्ग उपस्थित होता.