आमदार निधीतून शाळेंना बक्षीस देणार: आमदार अनिलबाबू देशमुख

    22-Jul-2024
Total Views |
- 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानाचे बक्षीस वितरण
- शिक्षण विभाग पंचायत समिती काटोलचे आयोजन
- कोंढाळी शाळेला जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार

Anil Deshmukh 
काटोल :
शिक्षण विभागात शिक्षक व अधिकारी यांची कमतरता असली तरी काटोल नरखेड विधानसभेतील शाळा गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल आहे, याचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना जाते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाप्रमाणेच ' आमदार माझी शाळा सुंदर शाळा' हा उपक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून काटोल विधानसभा क्षेत्रात राबविण्यात येईल व आमदार निधीतून शाळेंना भरघोस पारितोषिक देणार असे मत माजी गृहमंत्री तथा आमदार अनिलबाबू देशमुख यांनी व्यक्त केले.
 
शिक्षण विभाग, पंचायत समिती, काटोल तर्फे 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमातील तालुक्यात विजेता ठरलेल्या शाळेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पंचायत समिती सभागृह, काटोल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार अनिलबाबू देशमुख, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती संजय डांगोरे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती निशिकांत नागमोते पं.स.सदस्या अनुराधाताई खराडे, पं.स.सदस्या चंदाताई देव्हारे, पं.स.सदस्य अरुण उईके, पं.स.सदस्या लताताई धारपुरे, गटविकास अधिकारी रामदास गुंजरकर व गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार जनबंधू प्रामुख्याने उपस्थित होते.
 
तालुकास्तरीय स्पर्धेत 'स्थानिक स्वराज्य संस्था गटात' प्रथम क्रमांक - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कलंभा ,द्वितीय क्रमांक - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,चारगाव तर तृतीय क्रमांक - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आजनगांव यांनी पटकविला तर 'खाजगी अनुदानित शाळा' गटात प्रथम क्रमांक बनारसीदास रुईया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय काटोल, द्वितीय क्रमांक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कचारी सावंगा तर तृतीय क्रमांक संत गजानन महाराज विद्यालय, भोरगड यांनी प्राप्त केला यांना अनुक्रमे तीन, दोन,एक लक्ष रुपयाचे धनादेश, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
 
खाजगी शाळेत गटात लखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी यांनी जिल्हास्तरावर 'प्रथम' क्रमांक संपादन केल्यामुळे शाळेचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीत प्रथम पुरस्काराबद्दल प्राचार्य सुधीर चं. बुटे यांनी सुयशाबद्दल मनोगतातून विचार व्यक्त केले.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी राजू धवड, संचालन राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र बोढाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता शिक्षण विस्तार अधिकारी पांडुरंग भिंगारे केंद्रप्रमुख सुरेंद्र कोल्हे, रामभाऊ धर्मे, महेश राकेश, निळकंठ लोहकरे, रमेश गाढवे आदींनी सहकार्य केले.