मेळघाटातील सर्व विभागाने समन्वयातून काम करावे: जिल्हाधिकारी

    22-Jul-2024
Total Views |
- नव संजीवनी बैठकीत गाजले विविध मुद्दे

Saurabh Katiyar 
चुरणी :
सर्वच विभागाने एकमेकांसोबत समन्वय ठेवून मेळघाटात काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले. शनिवारी चिखलदरा नगरपरिषद सभागृहात नव संजीवनी ची बैठक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संजिता मोहपात्रा, चिखलदराच्या तहसीलदार अश्विनी जाधव, तसेच प्रकल्प अधिकारी, धारणी यासह विविध विभागाचे महत्त्वाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
 
‘एक दिवस मेळघाटसाठी’ या योजनेअंतर्गत 100 अधिकारी दोन दिवसांपासून मेळघाटात दाखल झाले होते. दरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी विविध गावांना भेटी दिल्या. त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर चिखलदरा येथे नवसंजिवनी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा आपली हजेरी लावली. या बैठकीत मेळघाटातील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली.
 
जिल्हाधिकारी यांनी यावेळी सर्वच विभागाने मेळघाटात रोजगार उपलब्ध करावा असे आवाहन केले. या ठिकाणी खासकरून वन विभाग व कृषी विभाग मुबलक प्रमाणात रोजगार देत नाहीत अशी ओरड होती. या दोन्ही विभागाने पावसाळ्यात सुद्धा रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून द्यावा, यासह आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी फैसवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला. अनेक डॉक्टर मुख्यालय राहत नाहीत. त्यामुळे आदिवासी बांधवांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहतो. हा प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. कुणी डॉक्टर उपस्थित राहत नसल्यास, त्या ठिकाणचे फोटो थेटे पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. तसेच पावसाळ्यात कुपोषण कमी करण्यासाठी तसेच दळणवळणाच्या संबंधित आरोग्य पाणी, शुद्ध पाणी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.