नागपूर जिल्ह्यातील 137 गावांमध्ये BSNL ची 4जी सेवा उपलब्ध होणार

    22-Jul-2024
Total Views |
BSNL
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
केंद्रीय संचार मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल (BSNL) हा सार्वजनिक उपक्रम सदैव ग्राहकांच्या सेवा केंद्रीत दृष्टिकोनाने काम करत असून केवळ नफा मिळवणे हा त्याचा उद्देश नाही. 4 जी सेच्युरेशन प्रकल्पाच्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 137 गावांमध्ये जेथे कुठलीही मोबाईल सेवा नव्हती तेथे बीएसएनएलची 4 जी सेवा आता उपलब्ध होत आहे . यामध्ये नागपूर मध्य प्रदेश सीमेवरील पारशिवनी, रामटेक अशा तालुक्यातील दुर्गम गावामध्ये देखील 4जी सेवा पोचली आहे अशी माहिती बीएसएनएल नागपूरचे मुख्य महाव्यवस्थापक यश पान्हेकर यांनी नागपूर मध्ये दिली. याप्रसंगी उपमहाव्यवस्थापक डी.पी. वासनिक, पी.टी ,गणवीर ,एच. एम.टिपरे तसेच मुख्य जनसंपर्क अधिकारी वी. वी. पराते उपस्थित होते.
 
बीएसएनएल च्या इतर खाजगी ऑपरेटर पेक्षा कमी असलेल्या दरामुळे या 3 जुलैपासून नागपूर शहरात 3,500 मोबाईल सिम कार्ड बीएसएनएलमध्ये पोर्ट झाले आहेत. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यामध्ये दोन लाख वीस हजारापेक्षा जास्त बीएसएनएल मोबाईल सिमचे ग्राहक आहेत. 21 हजारापेक्षा जास्त लँडलाईन फोन हे वापरात आहेत. फायबर टू द होम-एफटीटीएच या ऑप्टिक फायबरद्वारे उच्च गतीच्या इंटरनेटचे सुद्धा 23 हजार ग्राहक सध्या नागपूर जिल्ह्यात आहेत. सध्याच्या कॉपर नेटवर्कचे रूपांतरण ऑप्टिक फायबर नेटवर्कमध्ये करण्याचे काम सुद्धा चालू आहे. नागपुरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बीएसएनएलच्या जागा शासकीय तसेच खाजगी संस्थांना देऊन ही बीएसएनएलच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत आहे असेही यश पान्हेकर यांनी यावेळी सांगितले. सध्या अस्तित्वात असलेल्या 4 जी तंत्रज्ञानाला 2025 च्या वर्षा अखेरीस 5 जी पर्यंत रूपांतरित करण्याचा निर्धार हा बीएसएनएलचा आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
 
देशात 4जी स्तरावरची मोबाईल सेवा असली पाहिजे या उद्देशाने देशातील1 लाख गावापैकी ज्या 34 हजार गावात कोणतीही सेवा नव्हती त्याठिकाणी बीएसएनएलच्या 4जी सेक्युरेशन प्रोजेक्टच्या अंतर्गत बीटीएस टॉवर लावून 4जी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प बीएसएनएलने हाती घेतला आहे. यापैकी नागपूर ग्रामीण मध्ये भिवापूर तालुक्यातील गाडेघाट, घाटमोरी, किताडीमोखरबर्डी, कुही मध्ये सुभाष चौक, काटोल मध्ये खापा व कामठी मध्ये वारेगाव या 5 गावात सेवा 4 जी सेवा सुरु करण्यात आली आहे तर उर्वरित 111 गावांमध्ये शासकीय जमिनी या टॉवरच्या बांधकामासाठी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती पान्हेकर यांनी दिली. नागपूर शहरामध्ये जागेवर असे बीटीएस टॉवर भाडेतत्त्वावर घेऊन त्यांचीही बांधणी सुरू करण्यात येणार आहे असे देखील त्यांनी सांगितले. भविष्यात 'मशीन टू मशीन कम्युनिकेश'न साठी फिक्स लँडलाईन सर्विस ही महत्त्वाची असून त्या मार्फत माहितीची देवाण-घेवाणीसाठी डेटा हा महत्त्वाचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले.