चांदूर बाजारच्या आयटीआयला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार

    20-Jul-2024
Total Views |
- आ. बच्चू कडू यांच्या पुढाकाराने झाला संस्थेचा कायापालट

State Govt First Award to ITI Chandur Bazar 

चांदूर बाजार :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण प्रदान करण्यामध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या चांदूर बाजार येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला(आयटीआय) नुकताच राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचा वतीने राज्यातील "उत्कृष्ट आउद्योगीक प्रशिक्षण संस्था" हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आ. बच्चू कडू यांच्या पुढाकाराने कायापालट झालेल्या या संस्थेला हा बहुमान मिळाल्याबद्दल संस्थेच्या प्राचार्य, शिक्षक वृंद तथा कर्मचारी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याच्या उद्देशाने १५ फेब्रुवारी १९९९ रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीला वर्ग भरवण्यासाठी संस्थेकडे स्वतःची जागा नसल्याने तालुका खरेदी-विक्री संघाच्या गोदामाचा गाळा भाड्याने घेऊन हे वर्ग भरविण्यात येत होते. त्यावेळी सर्व कामकाज इथूनच चालत असल्याने सहा शाखांच्या विद्यार्थ्यांना एकत्रित प्रशिक्षण घेण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. बच्चू कडू यांनी आमदार झाल्यानंतर या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि त्यांची शिक्षण घेण्याची जिज्ञासा लक्षात घेऊन प्रथमतः संस्थेसाठी प्रशासकीय इमारत व इतर सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर त्यांच्याच माध्यमातून रामभाऊ मारोतरावजी काकडे यांनी संस्थेची इमारत बांधण्यासाठी आपली दीड एकर जागा दान दिली. २०११ मध्ये संस्थेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. पुढे संस्थेच्या दुसऱ्या मजल्याच्या कामासाठीही आ. बच्चू कडू यानी निधी उपलब्ध करून दिला. संस्थेला नवीन इमारत व सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडे कल वाढला.
 
तीनशे विद्यार्थी घेताहेत प्रशिक्षण
या संस्थेकडे आज स्वतःची प्रशस्त इमारत, ऑफिस, १२ वर्गखोल्या, स्वतंत्र वर्कशॉप, भांडारगृह, तसेच इतर विभागाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी सात विविध ट्रेडच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात असून सोळा तुकड्यांमध्ये जवळपास तीनशे विद्यार्थी दरवर्षी प्रशिक्षण घेत आहेत. संस्थेकडे सोळा शिक्षकांसह चौदा जणांचा कार्यालयीन व इतर कर्मचारी वर्ग आहे.
 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते, त्यांना जर योग्य प्रशिक्षण मिळाले तर ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. हाच विचार करून मी या संस्थेच्या पायाभूत विकासापासून ते गुणवत्ता वाढीसाठी लक्ष दिले. संस्थेला राज्यशासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. संस्थेच्या प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचे हे फळ आहे असे मी मानतो, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.