मनपाच्या संयुक्त चमूने वाचविले १०० नागरिकांचे प्राण

    20-Jul-2024
Total Views |

- विभागीय आयुक्तांनी केली परिस्थितीची पाहणी
- मनपा आयुक्तांकडून जाणून घेतली शहरातील परिस्थिती

Joint team of NMC saved lives of 100 citizens

 
नागपूर :
शहरात शनिवारी सकाळी झालेली मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले, शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेकजन पाण्यात अडकून पडले, अशा नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त चमू देवदूतच ठरले. मनपाच्या संयुक्त चमूने विविध ठिकाणी पावसात अडकून पडलेल्या १०० नागरिकांचे प्राण वाचविले. यात शाळकरी मुले, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शहरातील पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मनपास्थित श्रदेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर येथे भेट देत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली.
 
याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, अतिरिक्त आयुक्तद्वय आंचल गोयल व अजय चारठणकर प्रामुख्याने उपस्थित होते. विभागीय आयुक्त बिदरी यांनी मनपा आयुक्तांकडून शहरातील संपूर्ण परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
 
राज्याचे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या घराचे पंचनामे करून, त्यांना तत्काळ मदत दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेऊन संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्देश निर्गमित केले आहे.
 
शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचले, शहरातील विविध भागांमधल्या काही घरांमध्ये पाणी शिरले, काही ठिकाणी रस्त्यांवर झाड पडल्याने वाहतून विस्कळीत झाली, घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या चमूने त्वरित कार्यवाही करीत जनजीवन व वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.
 
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले की, रविवार 21 रोजी देखील पावसासंबंधित अलर्ट प्राप्त झाला असून, नागरिकांनी सतर्कता बाळगत अनावश्यक घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन विभागीय आयुक्त बिदरी यांनी केले. तर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, ज्याठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे, अशा ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्यदेत स्वच्छता करण्यात येत असून, डासांची उत्पत्ती होऊ नये, म्हणून प्रभावित परिसरात मलेरिया-फायलेरीया विभागाद्वारे फोगिंग व जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे.
 
मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे विविध भागात अडकून पडलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्यात मनपाच्या संयुक्त चमूला यश आले आहे. हुडकेश्वर येथील साईनगर स्थित अंटालिका महाविद्यालयात अडकलेल्या ५२ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच सेंट पाँल शाळेतील २६ विद्यार्थ्यांना व नरसाळा येथे पावसात अडकलेल्या १० नागरिकांना याशिवाय उमरेड रोड येथील विहीरगाव परिसरात अडकलेल्या २ गर्भवती महिलांना व इतर १० अशा एकूण १०० नागरिकांना सुखरूप पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. याशिवाय मनपाच्या कंट्रोल रूम मध्ये सकाळपासून अग्निशमन विभागाचे चमू नागरिकांच्या सेवेत तत्पर असल्याचे दिसून आले. घरात पावसाचे पाणी साचल्याची आणि रस्त्यांवर झाड पडण्याची विविध तक्रारी प्राप्त होताच तक्रारी संबधित झोन कार्यालय आणि अधिकाऱ्यांना पाठवूण्यात आली. यात एकूण ७१ ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याची आणि १८ ठिकाणी झाड पडल्याची तक्रारी प्राप्त झाल्या.
 
पाणीसाचल्याची माहिती मिळताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे व संबधित झोनचे अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत केली. घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात जवळपास २०० हून अधिक कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आले होते. याशिवाय उद्यान विभागाचे ५० हून अधिक कर्मचारी झोन निहाय सक्रीय होते. यात आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, प्रधान डाकघर चौक, पोलीस कंट्रोल रूम, पाचपावली पोलीस ठाणे, रामगिरी रोड, धोबी नगर, लष्करीबाग, मोमिनपुरा पोलीस चौकी, छापरु नगर आदी ठिकाणी झाड पडल्याची तक्रार प्राप्त होताच त्याचे त्वरित निराकरण करून मार्ग वाहतुकीस सुरळीत करण्यात आला. याशिवाय जलप्रदाय विभागामार्फत पाणी साचलेल्या भागांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय करण्यात आली, याकामासाठी विभागाकडून जवळपास ४० टँकरची मदत घेण्यात आली.