जीवंत विद्युत तार अंगावर पडल्याने शेतकरी दगावला

    20-Jul-2024
Total Views |
- मोर्शीतील माळीपुरा येथील घटना
- नागरिकांमध्ये संतापाची लाट, तणावाचे वातावरण

farmer died 
मोर्शी :
शेतातील वीज तारे अंगावर पडून एका शेतकर्याचा करुण अंत झाला. ही घटना 18 जुलै रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. विजय निळकंठराव भोजने (49, रा. माळीपुरा) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे तणावसदृष्य स्थिती निर्माण झाल्याने खळबळ उडाली होती.
 
18 जुलै रोजी सकाळी 8 वाजताचे सुमारास माळीपुरा येथील विजय भोजने हे नेहमीप्रमाणे मेंगवाडी शेतशिवार येथील आपल्या संत्र्याच्या बगीच्यात पाहणी करीत होते. दरम्यान त्यांच्या शेतातील लोंबकळणार्या विद्युत वाहिनीची एक तार तुटून थेट त्यांच्या अंगावर पडल्या. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शेतातील रखवालदारांना विजय भोजने हे शेतात पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्यांचे मोठे बंधू विलास भोजने व इतर मंडळींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याघटनेच्या माहितीवरून मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राज्य विद्युत वितरण कंपनी अधिकार्यांनाही ही माहिती देण्यात आली. मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रवी तायडे, अरुण लांडे, पोलीस नाईक सुमित पिढेकर, पोलिस हवालदार मंगेश श्रीराव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचार्यानी सुद्धा घटनास्थळी येऊन पंचनामा व इतर सोपस्कार पार पाडले. त्यानंतर मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी मात्र शेकडो नागरिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन जोपर्यंत मृतकाच्या कुटुंबियांना मदत मिळणार नाही तसेच मृतकाच्या मुलाला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात येणार नाही, तोपर्यंत प्रेत उचलणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
 
चार लाखांची मदत घोषीत
अल्पभूधारक शेतकरी असलेल्या विजयच्या अपघाती निधनाने त्याच्या परिवारावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. निष्काळजीपणे विद्युत पुरवठा करणार्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मृतकाचे परिवाराला तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विजय यांच्या पश्चात 80 वर्षाचे वृद्ध वडील, एक मोठा भाऊ, पत्नी व शाळा शिकणारा एक मुलगा व एक मुलगी असा बराच मोठा परिवार आहे. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकाच्या परिवाराला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने चार लाखाची तत्काळ मदत घोषीत करण्यात आली आहे.