मोरभवन बस स्थानकावर प्रवाश्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करावे : आयुक्त

    20-Jul-2024
Total Views |
 
Dr Abhijit Chaudhary
 
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या मोरभवन बस स्थानकावर प्रवाश्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिवहन विभागाला दिले. मोरभवन येथून मनपातर्फे संचालित आपली बस मधून दररोज हजारो प्रवासी कामठी-टेकाडी, मिहान, बुटीबोरी, कळमेश्वर, बहादुरा-फाटा आणि इतर ठिकाणी प्रवास करतात. आयुक्तांनी शुक्रवारी मोरभवन बस स्थानकांची पाहणी केली.
 
आयुक्तांनी प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, त्यांच्यासाठी शेड उभारणे व पावसाचे पाणी साचू नये म्हणून व्यवस्था करण्याचे निर्देशही दिले. मनपा तर्फे मुरुम टाकून मोरभवन बस स्थानकाचे सर्व खड्डे बुजविण्याचे व जागा समतल करण्याचे ही आदेश दिले. पावसाळयात मोरभवन बस स्थानकाच्या एक्सटेंशन भागात प्रवाश्यांना कोणत्याही परिस्थितीत चिखलामध्ये जावे लागणार नाही याची पूर्ण दखल घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
 
याप्रसंगी अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, अजय डहाके, उप अभियंता लुंगे, परिवहन विभागाचे घाटोळे, जोशी, रविंन्द्र पागे उपस्थित होते.