याला म्हणतात प्रशासकीय ईच्छाशक्ती

    20-Jul-2024
Total Views |
- काही तासाचे परिश्रम अन् अनेक वर्षांपासून बुजलेले प्रवाह मोकळे
- उपायुक्त माधुरी मडावींनी वेळकाढू अधिकाऱ्यांचा फाडला बुरखा

deputy commissioner madhuri madavi 

अमरावती :
गेल्या काही वर्षात वेळकाढू महापालिका अशी ओळख झालेल्या अमरावती महापालिकेची ही ओळख पुसण्याची वेळ आली आहे. नव्यानेच रुजू झालेले आयुक्त सचिन कलंत्रे आणि उपायुक्त माधुरी मडावी यांच्या रुपाने जनसामान्यांना आशेचा किरण दिसत आहे. आयुक्त कलंत्रे यांनी शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर डेयर, डॅशिंग उपायुक्त माधुरी मडावी यांनी प्रशासकीय ईच्छाशक्ती कश्याला म्हणतात, याचे उदाहरण दाखवून दिले. त्यांनी अनेक वर्षांपासून ठिकठिकाणी बुजलेला अंबानाल्याचा प्रवाह तर मोकळा केलाच, अन् सोबत वेळ मारुन नेणाऱ्या अधिकाऱ्यांचा बुरखा ही फाडला.
 
मान्सून पुर्व तयारीच्या नावावर नाले सफाईची बोळवण करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारांना चपराक बसावी अशी नालसफाई नवनियुक्त उपायुक्त माधुरी मडावी यांनी अवघ्या काही तासात करुन दाखविली. मडावी यांनी दुपारी चार वाजता अंबानाल्याच्या पाहणीला सुरुवात केली. सुरुवातीलाच त्यांना नमुना जवळ अंबानाल्यावर महापालिकेव्दारे टाकण्यात आलेला स्लॅब दिसून पडला, जो मोठ्याप्रमाणात नाल्याच्या प्रवाहाला बाधा उत्पन्न करित होता. तत्कालीन आमदार रावसाहेब शेखावत यांच्या काळात टाकण्यात आलेला हा स्लॅब असल्याचे एका अधिका:याने सांगितले आणि नवरात्रीमध्ये वाहनांची पार्कींग करण्याकरिता हा स्लॅब टाकण्यात आला होता, अशी माहितीसुध्दा पुरविली. नवरात्रीत या स्लॅबवर वाहनांची पार्कींग होतच नाही, हे वास्तव आहे.
 
तातडीने हटविले दुकान
अंबा नाल्याची पाहणी करताना उपायुक्तांना नाल्यात मोठ्याप्रमाणात कचरा आढळून आला. उपायुक्तांनी तातडीने प्रभागातील स्वच्छता करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाहणीस्थळी बोलावून तातडीने येथील कचरा उचलायला लावला. तेथेच बाजूला नालीवर अतिक्रमण करून दुकान (खोका) थाटण्यात आले होते. या दुकानामुळे नालीचा थांबत असल्याचे निदर्शनास येताच, उपायुक्तांनी तो खोका तातडीने हटवायला लावला.
 
आपल्या जेसीबीची वयोमर्यादा संपली
उपायुक्त मडावी नंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला लागून वाहणा:या अंबा नाल्याच्या काठावर मोठ्याप्रमाणात कचरा जमा झाला होता. हा कचरा उचलण्याकरिता यावेळी जेसीबी आणण्याचे निर्देश उपायुक्तांनी दिल्यावर उपस्थित अधिकारी आपल्या जेसीबीची वयोमर्यादा संपली आहे, भाड्याने जेसीबी आणावे लागेल असे सांगितले. अधिकारी वेळकाढू धोरण राबविण्याचा प्रकार होत असल्याचे लक्षात येताच उपायुक्तांनी जसा आहे तसाच जेसीबी आणायला लावला, नंतर जेसीबी आतमध्ये जाणार नाही, असे उत्तर अधिकारी देत होते, रॅम्प करुन जेसीबी आतमध्ये टाकण्याची सल्ला उपायुक्तांनी यावेळी दिली. तसेच तेथील कचरासुध्दा साफ करुन घेतला. असाच प्रकार हनुमान नगर परीसरातील सागर नगर या ठिकाणी घडला. जमलेल्या मातीमुळे नाल्याचा एक प्रवाह दोन प्रवाहात वाटल्या गेला होता. उपायुक्तांनी तातडीने हे दोन्ही प्रवाह जेसीबीच्या सहायाने एकमेकांशी जोडायला लावले. ही कार्यवाही होईस्तोवर उपायुक्त मडावी तेथे हजर होत्या.
 
नाल्याचा पात्रात उतरुन रपेट
नाल्याची पाहणी करताना कुठलीच तमा न बाळगता, उपायुक्त मडावी स्वत: नाल्याचा पात्रात उतरल्या आणि आपल्या अधिकाऱ्यांनाही कचऱ्यामुळे बुजलेल्या नाल्याची पाहणी करित अर्धा किलोमीटर आत रपेट घडविली. यादरम्यान त्यांना विविध समस्येकरिता फोनसुध्दा सुध्दा सुरु होते. ते फोनही त्या उचलत होत्या. सफाई मोहिमेनंतर त्यांनी संध्याकाळी शहर स्वच्छतेसंबधी त्यांनी सर्व झोन अधिका:यांची बैठकही आयोजित केली. हे विशेष.