क्रिकेट खेळताना वीज कोसळून युवक ठार

    19-Jul-2024
Total Views |
- पाच मित्र थोडक्यात बचावले
 
Youth killed by lightning
(Image Source : Internet)
 
वाडी :
वाडी येथील न्यु मंगलधाम सोसायटीमधील सार्वजनिक शिवमंदीराच्या परिसराच्या मागील मोकळ्या जागेत गुरुवार १८ जुलै रोजी दुपारी ५ वाजता क्रिकेट खेळत असताना अचानक वीज कोसळली. यात क्रिकेट खेळणाऱ्या एकाचा होरपळून मृत्यू झाला तर इतर पाच मित्र थोडक्यात बचावले.
 
शिवकुमार फकिरा सय्याम वय १६ वर्ष रा. अभिजित नगर, वाडी असे मृताचे नाव आहे. अचानक पावसाला सुरूवात झाली. पावसातही काहींना क्रिकेटचा मोह आवरला नाही. त्यामुळे पावसातही क्रिकेट खेळत होते. दरम्यान विजेचा कडकडाट झाला. मैदानात वीज कोसळली व शिवकुमार यात होरपळल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर मैदानात खेळत असलेली इतर मुले थोडक्यात बचावली. शिवकुमार हा इयत्ता अकरावीचा विद्यार्थी होता.
 
घटनेची माहिती मिळताच सार्वजानिक शिवमंदीर ट्रस्टचे अध्यक्ष कमल कनोजे व त्यांचे सहकारी,इतर परिचित व त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृत शिवकुमार हा अकरावीत शिकत होते. त्याचे पितृछत्र हरविले होते. आई व दोन बहिणींसोबत तो अभिजीत नगरात भाड्याच्या घरात राहत होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसररली आहे.