पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांच्या पदस्थापनेपूर्वी होणार कार्यरत शिक्षकांच्या बदल्या

    19-Jul-2024
Total Views |
- सीईओनी घेतलेल्या शिक्षक संघटनाच्या बैठकीत निघाला तोडगा

Transfer of working teachers to be done before posting
 (Image Source : Internet)
वाडी :
पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्हांतर्गत कार्यरत शिक्षकांची बदली प्रकिया राबवावी, याबाबतचा वाद शेवटी उपमुख्यमंत्र्याच्या दरबारात पोहोचल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौम्या शर्मा यांनी शिक्षक संघटनांची सभा बोलविली आणि या सभेत शेवटी शिक्षकांच्या बदलीच्या विषयावर तोडगा निघाला.
 
पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत १२० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. या शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्ह्यात सध्या कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून लावून धरण्यात आली होती. परंतु, जिल्हा परिषद प्रशासनाकडून सदर मागणी मंजूर करण्यात येत नव्हती. शेवटी हा वाद उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहचला.
 
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, संघटनेचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापुर्वी जिल्हांतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.
 
उपमुख्यमंत्र्याकडून या बाबीची सकारात्मक दखल घेत कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत जि.प.नागपूर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दुरध्वनीवरून निर्देश दिले आणि त्यामुळे पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त शिक्षकांपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा झाला.
 
शिष्टमंडळात केंद्र प्रमुख प्रकाश सव्वालाखे, निळकंठ लोहकरे, राजू बोकडे, सुरेश श्रीखंडे, धर्मेंद्र गिरडकर, दिगांबर ठाकरे, विजय उमक, सुरेश भोसकर, अशोक बांते, दामोधर कोपरकर, योगेश राऊत आदी सहभागी होते.
 
मुख्य कार्यकारी अधिकारी सोबतच्या बैठकीत निघाला तोडगा
 
उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभा आयोजित करून बदली प्रक्रियेबाबतची मते जाणून घेतली व अटी शर्ती बाबत अवगत केले व शिक्षण विभागास अहवाल तयार करण्याचे तसेच इच्छूक व पात्र शिक्षकांचे अर्ज मागविण्याची निर्देश दिले. एकंदरीत या सभेत बदलीबाबतच्या वादावर यशस्वी तोडगा निघाल्याची चर्चा आहे.