साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त भाजपातर्फे अभिवादन

    19-Jul-2024
Total Views |
 
Annabhau Sathe
 
नागपूर :
अण्णाभाऊ साठे यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य भाजपतर्फे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले.
 
यावेळी अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात मार्गदर्शन करत संवेदना व्यक्त केल्या. याप्रसंगी इंद्रजीत वासनिक, किशोर बेहाडे, संजय कठाले, नितीन वाघमारे, बंटी पैसाडेली, शंकरराव वानखेडे, भारती, सुनील शीरसाट, संस्थेचे पदाधिकारी व भाजपचे अनेक शहर पदाधिकारी उपस्थित होते.
 
आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंबऱ्या, पोवाडा, लावण्या, वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांचे महात्म्य शब्दात मांडता न येणारे असल्याची प्रतिक्रीया यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.
 
'जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव' हे त्यांचे गीत आंबेडकरी चळवळीसाठी स्फूर्तिगीत ठरले. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहानश्या गावात जन्मलेल्या तुकाराम भाऊराव ऊर्फ साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास हा प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. तांत्रिकदृष्ट्या अशिक्षित असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
 
अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या फकिरा या कादंबरीला १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या लघु कथांचा संग्रहाची संख्या १५ आहे. ज्या बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अन्य भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त त्यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली आहेत. साहित्यासोबत बुलबुल, बासरी, हार्मोनियम अशी वाद्येही ते वाजवीत, अशी माहितीही यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.