सरकार ची 1 रूपयात पिक विमा योजना फसवी

    18-Jul-2024
Total Views |
- पत्रपरीषदेत भूमिपुत्र ब्रिगेडचे सदस्य विजय मुसळे यांचा आरोप
 
Govts Rs 1 crop insurance scheme is fraudulent
 (Image Source : Internet/)
चंद्रपूर :
सरकारद्वारे अधिकृत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीद्वारे शेतकऱ्यांनी 1 रूपयात पिक विमा काढला. परंतु पिकांचे नुकसान झाल्यास त्या क्षेत्राचा पंचनामा करने हे ओरिएंटल इन्शुरंस कंपनी अथवा कृषी विभागाचे काम असताना हे काम तिसरीच झेनित सोल्युशन प्रा. लि. हे पंचनामा करीत आहे. त्यामुळे पंचनामा करण्यामध्ये सावळागोंधळ होत असून काही शेतकऱ्यांना विमा लाभ मिळाला, तर काही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे सरकारी 1 रूपयात पिक विमा ही योजना फसवी असल्याचा आरोप भूमिपुत्र ब्रिगेडचे सदस्य विजय मुसळे यांनी गुरूवारी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरीषदेत केला आहे.'
 
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत कित्येक शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतमालाचा 1 रूपयामध्ये पिक विमा काढला. हा पिक विमा सरकारद्वारे अधिकृत ओरिएंटल इन्शुरंन्स कंपनीद्वारे काढण्यात येत आहे. पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानी नोंद आनलाईन पद्धतीने दिलेल्या वेळेच्या आत केली होती. यानंतर पीक विमा राशी मिळण्यास सुरूवात झाली असता मूल तहसील चे हळदा गावातील काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला, तर काही शेतकरी पात्र असूनही त्यांना लाभ मिळाला नसल्याने याची तक्रार भूमिपुत्र ब्रिगेडचे राकेश गावतुरे यांच्याकडे केली असता यासंदर्भात कृषी विभाग उपसंचालक चंद्रपूर यांचेकडे विचारणा केली. त्यांनी ओरिएंटल कंपनीकडे विचारणा करण्याची माहिती दिली.
 
वास्तविक पंचनामा करण्याचे काम ओरिएंटल कंपनीचे कर्मचारी अथवा कृषी विभाग कर्मचारी यांना असताना हे काम तिसरीच कंपनी झेनित सोल्युशन प्रा. लि. ला दिले. संबंधित तीसरी कंपनीला विचारण केली असता वेळेच्या आत नुकसानीच्या पिकांची नोंद न केल्यामुळे पिक विमासाठी अपात्र असल्याची माहिती दिली. परंतु शेतकऱ्यांनी उपसंचालक कृषी विभाग यांचे समक्ष वेळेत नोंदणी केल्याचे पुरावे सादर केले. झेनित कंपनी कार्यालयात गेले असता त्याला कुलूप लागलेले असते. त्यामुळे कोणत्या अटीवर शेतकऱ्यांना पात्र अपात्र ठरविण्यात येत आहे, याबद्दल कळायला मार्ग नाही. तसेच याला जिम्मेदार कोण? असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 1 रूपयामध्ये पिक विमा योजना फसवी असल्याचा आरोप भूमिपुत्र ब्रिगेड सदस्य विजय मुसळे यांनी केला आहे.
 
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा राशी लवकरात लवकर जमा न झाल्यास भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेडच्या माध्यमानून तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पत्रपरीषदेत भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेडचे विजय मुसळे, दिपक वाढई, प्रकाश चालुरकर, विक्रम गुरनूले, रितेश मैकलवार आदि उपस्थित होते.