चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी रुळावरून घसरल्या; तिघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

    18-Jul-2024
Total Views |
Chandigarh Dibrugarh Express derailed
 (Image Source : Internet)
 
नवी दिल्ली :
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या तब्बल १४ बोग्या रुळावरून घसरल्या असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गोंडा-गोरखपूर रेल्वे मार्गावर मोतीगंजच्या पिकौरा गावाजवळ हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलिस दलांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्या लोकांना रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. अपघातामुळे या वळणावरील रेल्वेगाड्या वळवल्या असल्याची माहिती ईशान्य रेल्वेचे सीपीआरओ पंकज सिंह यांनी दिली आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात गोंडा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर झाला. यात ट्रेनच्या एसी कोचचे मोठे नुकसान झाले. अचानक गाडी रुळावरून घसरल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातग्रस्त डब्यात अनेक प्रवासी अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी स्थानिक लोक मदत आणि बचाव कार्य करत आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.