रिचा चढ्ढा आणि अली फजल यांना कन्यारत्न; चाहत्यांबरोबर शेअर केली बातमी

    18-Jul-2024
Total Views |
Ali Fazal and Richa Chadha
 (Image Source : Instagram/ therichachadha)
 
मुंबई :
बॉलिवूड कपल अली फजल आणि ऋचा चढ्ढा (Ali Fazal and Richa Chadha) नुकतेच आई-वडील झाले असून त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रिचा चढ्ढाने आई झाली असून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर दोन दिवसांनी रिचा आणि अलीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 16 जुलै रोजी अली आणि रिचाच्या घरी पाळणा हलला असून संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तसेच ही बातमी समोर येताच चाहत्यांकडून रिचा आणि अलीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.
 
रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट केले होते. रिचाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बेबी बंपसह मॅटर्निटी शूटचे फोटोज देखील चाहत्यांबरोबर शेअर केले होते. आता या कपलने आपल्या बाळाच्या जन्माची बातमी शेअर केली आहे.
 
रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी एका संयुक्त निवेदनात आनंदाची बातमी दिली असून त्यांनी म्हंटले की, 'आम्हाला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की आमच्या घरी 16 जुलै 24 रोजी एका निरोगी मुलीने जन्म घेतला आहे. कुटुंब आनंदी आहे आणि आम्ही आमच्या शुभचिंतकांचे प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार मानतो.'
 
 
 
दरम्यान, एक दिवस आधी रिचा चढ्ढाने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. यासोबत तिने भावनिक कॅप्शनही लिहिले होते. 'शुद्ध प्रेम जगाला प्रकाशाच्या किरणांशिवाय काय आणू शकते? या अविश्वसनीय प्रवासात माझा सोबती असल्याबद्दल अली फजल धन्यवाद. रिचानेही रिद बर्मनचे या फोटोशूटसाठी आभार मानले.