विजापूरमध्ये IED स्फोटात 2 सुरक्षा जवान शहीद, 4 जखमी

    18-Jul-2024
Total Views |
IED blast in Bijapur
 (Image Source : Internet/ Representative)
 
विजापूर :
छत्तीसगड राज्यातील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात दोन सुरक्षा कर्मचारी शहीद झाले असून चार जवान जखमी झाले असल्याची बातमी समोर आली आहे. शोध मोहिमेवरून परतत असताना नक्षलवाद्यांनी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) ठेवल्याने ही घटना घडली. जखमी जवानांवर रायपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी माहिती दिली आहे.
 
 
पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूर-सुकमा-दंतेवाडा जिल्ह्यांच्या त्रि-जंक्शनवरील जंगलात नक्षलवादविरोधी कारवाईनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक परतत असताना ताररेम भागात ही घटना घडली. यामध्ये STF, जिल्हा राखीव रक्षक - राज्य पोलिसांच्या दोन्ही तुकड्या, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांचा या ऑपरेशनमध्ये समावेश होता. यामध्ये दोन एसटीएफ कॉन्स्टेबल शहीद झाले आणि चार जवान जखमी झाले आहेत. रायपूरचे रहिवासी भरत साहू आणि नारायणपूर जिल्ह्यातील सत्येर सिंग असे शहीद जवानांचे नाव आहे, असे जितेंद्र यादव यांनी सांगितले आहे.
 
 
दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनीही जवानांच्या निधनाबद्दल एक्सवर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'विजापूर जिल्ह्यातील ताररेम भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात 2 STF जवान शहीद झाल्याची आणि 4 जवान जखमी झाल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. शहीद जवानांच्या आत्म्याला शांती लाभो आणि जखमी सैनिक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यासाठी आमच्या सरकारकडून सुरू असलेल्या मोहिमेमुळे नक्षलवादी अस्वस्थ झाले असून भ्याड कृत्ये करत आहेत. जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. नक्षलवाद संपेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.'