कर्मचाऱ्यांच्या कामबंदमुळे महसूलचे कामकाज प्रभावित

    17-Jul-2024
Total Views |
- जिल्हाभर महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

Amravati
अमरावती :
प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारा सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामुळे जिल्हाभरातील महसूल यंत्रणा ठप्प झाली व कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून आले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेचे जिल्हाध्यक्ष ब्रिजेश वस्तानी यांच्या नेतृत्वात सर्व कर्मचाऱ्यांनी प्रांगणात ठिय्या दिला, तर विभागीय आयुक्त कार्यालयात राज्य समन्वयक राजू धांडे, संघटन चंदू प्रधान, कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचे प्रवेशद्वारा निदर्शने केलीत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व तहसील व एसडीओ कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद पुकारल्याने महसूल यंत्रणेचे कामकाज पहिल्याच दिवशी ढेपाळल्याचे दिसून आले.
 
महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समिती अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचाऱ्यांची कपात न करता लागू करण्यात यावा. अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पद्दोनती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावे. महसूल विभागाचा आकृतीबंध तत्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचाऱ्यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे. वेतनेदेयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तत्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. महसूल सहायकाचा ग्रेडपे १९०० रुपयांवरून २४०० रुपये करण्यात यावा. महसूल सहायक व तलाठी यांना सेवांतर्गत एकसमान परीक्षा पद्धती लागू करण्यात याव्यात, यासह अन्य मागण्या आंदोलनात करण्यात आल्या आहेत.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाध्यक्ष ब्रिजेश वस्तानीसह सागर बनसोडे, मंगेशमाहूलकर, सिद्धार्थ नवाडे, दिपक सिरसाट, गजानन टापरे, महादेव उमाळे, मदन जऊळकर, हरीष खरबडकड, लता पुंड, संगिता तांडील, जयश्री सातव, सुवर्णा रत्नपारखी यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी आंदोलनात होते.