चांदुर बाजार बसस्थानकातील हिरकणी कक्षाला टाळे

    17-Jul-2024
Total Views |
- परिवहन विभागाकडून शासनाच्या धोरणाला हरताळ

Hirakni Room  
चांदुर बाजार :
चांदुर बाजार येथील बसस्थानकामधील हिरकणी कक्ष फक्त नावालाच उभारण्यात आले असल्याचे दिसत आहे. हा कक्ष नेहमीच कुलूप बंद असतो, अशी माहिती प्रवासी स्तनदा मातांकडून मिळाली. परिवहन महामंडळाने प्रवासी स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाचे धोरण राबवले. मात्र स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून या धोरणाला हरताळ फासल्याचे चित्र समोर येत आहे.
 
आपल्या बाळाला दूध पाजताना मातांची होणारी कुचंबणा लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील विविध बसस्थानकावर हिरकणी कक्ष सुरू केले. चांदुर बाजार बसस्थानकात देखील हिरकणी कक्षाची स्थापना केली. मात्र हा कक्ष कुलूप बंद असतो. राज्यातील महायुतीच्या शिंदे सरकारने महिलांना पन्नास टक्के बसभाड्यात सवलत दिली असल्याने ९५ टक्के महिला वर्ग एसटी बसने प्रवास करीत आहे. स्तनदा महिला आपल्या तान्हुल्या बाळांना घेऊन प्रवास करीत आहे. बसस्थानकावरील गोंधळ, गर्दी लाऊडस्पीकर, विविध वाहनांच्या हॉर्न कर्कश आवाज यामुळे लहान बाळांची चिडचिड होते. त्यामुळे बाळ रडू लागल्यास मातांना आपल्या बाळांना स्तनपान करावे लागते. मात्र हिरकणी कक्ष कुलूपबंद असल्याने उघड्यावर स्तनपान करण्याची वेळ महिलांवर येत असल्याने यामूळे त्यांची कुंचबणा होत असल्याचे दिसत आहे. या संदर्भात चांदुर बाजार आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयीन क्रमांक 3 वेळा संपर्क केला असता त्यांच्या कडून कुठला प्रतिसाद मिळाला नाही.
 
ज्यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, त्याच उद्देशाला चांदूर बाजार एसटी बस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी अयशस्वी करत आहे. हिरकणी कक्षाला लावलेल्या कुलूपाची चाबी कोणाकडे शोधायची हा प्रश्न महिलांसमोर आहे. त्या ठिकाणी चाबीसाठी महिलांना फिरावे लागत असेल तर त्या हिरकणी कक्षाचा नेमका उद्देश तरी काय असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यावर दोषी अधिकारावर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी समाजसेविका आश्विनी डकरे यांनी केली आहे.