डीपी, ट्रांसफार्मरमधील 600 लिटर ऑईल चोरी

    16-Jul-2024
Total Views |
- ट्रक चालविण्यासाठी आरोपीने लढवली शक्कल
 
- आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
 
Theft of 600 liters oil
 (Image Source : Internet/ Representative)
नागपूर :
ट्रक चालविण्यासाठी पेट्रोल-डिझेलचा खर्च परवडत नसल्यामुळे त्याने शक्कल लढवली. त्याला ईलेक्ट्रीकचे थोडेफार ज्ञान होते. याच आधारावर जीव धोक्यात घालून त्याने साथीदारासोबत मिळून डीपी, ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरी केले. चोरीच्या ऑईलवर तो ट्रक चालवित होता. बेलतरोडी पोलिसांनी ट्रक नंबरवरून त्याचा शोध घेत बेड्या ठोकल्या. सिकंदर गोंडाणे (45) रा. सुगतनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. पोलिसांनी श्रीधर मोहाडीकर (48) रा. प्रेमनगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला होता.
 
श्रीधर हे खापरी येथे इलेक्ट्रिक लाईन मॅन म्हणून काम करतात. आरोपी सिकंदरकडे दोन ट्रक आहेत. दोन्ही ट्रक नागपूर कोलकाता मार्गावर चालतात. ट्रकचे हप्ते थकलेले आहेत. पेट्रोल-डिझेल भरणेही कठीण होत होते. त्यामुळे ऑईल चोरीची त्याने शक्कल लढविली. यासाठी तो सहकारी चालकासोबत 12 जुलै रोजी शंकरपूर ओझोन सिटी सेक्टर नंबर 9 येथे गेला. निर्जन परिसर असल्याचे पाहून त्याने एका विद्युत डीपी जवळ ट्रक थांबविला. दोघांनाही ईलेक्ट्रीकचे थोडेफार ज्ञान आहे. त्यामुळे डीपी उघडून त्यांनी ट्रकमध्ये 300 लिटर ऑईल घातले. डीपीतील ऑईल संपल्यानंतर थोड्याच अंतरावर एका ट्रान्सफार्मर जवळ ट्रक थांबविला. त्यातूनही 300 लिटर ऑईल चोरी केले. आणखी ऑईल काढत असताना एका जागरूक व्यक्तीचे लक्ष गेले. त्याने आरडा ओरड करताच आरोपी पळून गेले. मात्र, त्या व्यक्तीने ट्रकचा नंबर लिहून ठेवला. जागरुक व्यक्तीने लाईन मॅन मोहाडीकर यांना माहिती दिली. डीपीची पाहणी केल्यानंतर त्यांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
असा घेतला शोध
 
पोलिसांनी ट्रक नंबरच्या आधारे त्याचे नाव आणि पत्ता शोधून काढला. जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत सुगत नगरातील त्याच्या घरून त्याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ट्रक व चोरी केलेले इलेक्ट्रिक डीपी, ट्रांसफार्मर मधील अंदाजे 300 लिटर ऑईल असा एकूण 15 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात त्याने सहकाऱ्यासोबत मिळून ऑईल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस आता त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत. ही कामगिरी वपोनि मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनात हवालदार शैलेश बडोदेकर, जयंत शंभरकर, कुणाल लांडगे, हेमंत उईके, अरुण सातपुते यांनी केली. यासाठी सायबरच पथकाने सहकार्य केले.