दीक्षाभूमीच्या पर्यायी जागेसाठी विद्यार्थ्यांचे निवेदन

    16-Jul-2024
Total Views |

Statement of students for alternative place of Dikshabhoomi
 
 
एबी न्यूज नेटवर्क :
दीक्षाभूमी स्मारक समितीकडे असलेल्या जागेच्या कमतरतेमुळे स्मारकाच्या सौंदर्यीकरण व विकास कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे स्मारकाच्या उत्तरेकडील कॉटन रिसर्च सेंटरची 5 एकर जागा व पूर्वेकडील आरोग्य विभाग (व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट) ची 16 एकर जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला धम्म कार्य व शैक्षणिक कार्याकरिता देण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन बुद्धिस्टंट स्टुडंट असोसिएशनने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे देण्यात आले.
 
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी ज्या जागेवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्या जागेला दीक्षाभूमी म्हणून जगभर मान्यता मिळाली. येथे वर्षभर धम्मचक्र प्रवर्तन दिन, आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, संविधान दिन, महापरिनिर्वाण दिन, शौर्य दिन, गणराज्य दिन, धम्म संमेलन आदी कार्यक्रम होत असतात.
 
दीक्षाभूमीवर वर्षभर लाखो अनुयायांची ये जा सुरू असते. येथून धम्मकार्य, प्रबोधनात्मक व शैक्षणिक कार्य नियमित सुरू असते. दीक्षाभूमी ला पर्यटनाचा अ दर्जा मिळाला असल्याने स्मारकाच्या विकास कार्याकरिता दिवसेंदिवस जागा अपुरी पडत आहे. स्मारका शेजारची निरुपयोगी जागा महाराष्ट्र शासनाची असल्याने शासनाने ती विनाविलंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या स्वाधीन करावी असेही निवेदनात म्हटले आहे.
 
बुद्धिस्टंट स्टुडन्ट असोसिएशन चे अध्यक्ष भिक्खू महेंद्र कौसल, सचिव उत्तम शेवडे, कोषाध्यक्ष सुनील लांडे, उपाध्यक्ष नरेश मेश्राम, सिद्धार्थ फोपरे, परशराम पाटील, दिलीप गायकवाड, शामराव हाडके, मोरेश्वर मंडपे, विजय जांगळेकर, हिरालाल मेश्राम, किशोर भैसारे, विजय वासनिक आदींनी दिलेले निवेदन जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत उपजिल्हाधिकारी महाजन यांनी स्वीकारले.
 
बुद्धिस्ट स्टुडन्ट असोसिएशन ही नागपूर विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर विचारधारा, बौद्ध अध्ययन, पाली पदव्युत्तर विभागातील आजी माजी विद्यार्थ्यांची संस्था असून यात बहुतेक समाजाच्या विविध स्तरातील व विविध विभागातील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.