भूमाफियांच्या ‘टार्गेट’वर दक्षिण नागपूर

    16-Jul-2024
Total Views |
- तक्रार निवारण शिबिरात मिळाल्या सर्वाधिक 106 तक्रारी

South Nagpur on the target of land mafia
 (Image Source : Internet)
नागपूर :
भूखंडाच्या व्यवहाराशी संबंधित तक्रारी गंभीरतेने घेत पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी सोमवारी तक्रार निवारण शिबिर आयोजित केले होते. सकाळी 11 वाजतापासूनच पोलिस भवनच्या सभागृहात पीडित नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. शहरभरातून लोक तक्रारींसह आले होते. मात्र सर्वाधिक 106 तक्रारी परिमंडळ क्र. 4 अंतर्गत मिळाल्या. यावरून दक्षीण नागपूर भूमाफियांच्या टार्गेटवर असल्याचे लक्षात येते.
 
वाठोडा, बेलतरोडी, हुडकेश्वर आणि नंदनवन परिसरात वेगाने विकासकामे सुरू आहेत. रिअल इस्टेट व्यवसायाच्या भरभराटीने येथे भूमाफियाही सक्रिय झाले आहेत. लोकांच्या जमीन आणि घरावर ताबा करण्याची प्रकरणे सतत वाढत आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने पोलिस आयुक्तांनी शिबिर आयोजित केले. या शिबिरात शहरातील सर्व 5 डीसीपी आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ठाण्यांचे अधिकाऱ्यांना एकत्र सभागृहात बसविण्यात आले. स्वत: पोलिस आयुक्तांनी सर्व तक्रारी ऐकल्या आणि अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले.
 
शहरभरातून एकूण 252 तक्रारी मिळाल्या. 9 प्रकरणात पोलिस आयुक्तांनी तत्काळ ठाणेदारांना गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. आश्चर्य म्हणजे, सर्व 9 प्रकरण परिमंडळ क्र. 4 अंतर्गत नोंदविण्यात आले आहेत. बेलतरोडीमध्ये 3, अजनीत 2, हुडकेश्वर 1, नंदनवन येथे 2 आणि वाठोड्यात एक प्रकरण नोंदविण्यात आले. दक्षीण नागपूरशीच संबंधित 20 इतजर तक्रारींमध्येही गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. शहराच्या इतर भागातून आलेल्या 12 तक्रारींचा शिबिरातच निपटारा करण्यात आला.
 
2 दिवसानंतर पुन्हा आढावा
 
पोलिस आयुक्त सिंघल यांनी सांगितले की, शिबिरात तक्रारकर्त्यांच्या उपस्थितीवरूनच समजते की, शहरात जमिनीशी संबंधित वाद वाढले आहेत. सामान्य नागरिकांची पोलिस ठाण्यांत सुनावणी होते किंवा नाही हे जाणून घेणे ही आवश्यक होते. जमिनीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात तत्काळ एफआयआर नोंदविणे शक्य होत नाही. सर्वप्रथम कागदपत्रांची संपूर्ण तपासणी केली जाते. मात्र लवकरच इतर तक्रारींचेही निवारण होईल. 20 प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. दोन दिवसानंतर संबंधित झोनच्या डीसीपींसोबत ठाणेदारांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल.
 
तर नोंदविणार मोक्का अंतर्गत गुन्हे
 
पोलिस आयुक्त म्हणाले की, काही प्रकरणात एकच भूखंड वारंवार दुसऱ्याला विकण्यात आल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी सांगितले की, त्यांची फसवणूक आणि जमीन हडपणाऱ्यांवर आधीही गुन्हे नोंद झाले आहेत. अशा लोकांना सोडले जाणार नाही. त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड काढून त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल. अनेक बिल्डर आणि प्रॉपर्टी ब्रोकर्सचे नाव समोर आले आहेत. पोलिस त्यांची कुंडली काढत आहे. काही प्रकरणे खूपच गुंतागुंतीची आहेत. जर इतर सरकारी विभागांचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची भूमिका पुढे आली तर त्यांच्यावरही गुन्हा नोंदविला जाईल.