मुलांच्या प्रेमासाठी म्हातार्‍या जोडप्याची भावनिक घुसमट

    16-Jul-2024
Total Views |
- ‘संध्याछाया’ नाटकाच्‍या प्रयोगाला रसिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
 
Old couples emotional struggle for their Childrens Love
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
मुलांच्या प्रेमासाठी म्हातार्‍या जोडप्याची भावनिक घुसमट प्रदर्शित करणा-या प्रसिद्ध नाटककार कै. दळवी लिखित ‘संध्याछाया’ या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग स्‍थानिक कलाकारांनी सोमवारी सायंकाळी लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात यशस्वीरित्या सादर केला. या प्रयोगाला रसिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला.
 
यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, डॉ. पराग घोंगे आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. मंजुश्री सरदेशपांडे, निखिल गोंंधळेकर, प्रकाश एदलाबादकर व रमेश लखमापुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नाट्यप्रयोगाला प्रारंभ झाला. सत्तरच्या दशकात गाजलेल्या नाटकाचा प्रयोग पुन्हा नव्याने सादर करताना स्थानिक कलावंतांनी मुले-नातवंडांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या म्हातार्‍या जोडप्याची भावनिक घुसमट अतिशय दमदारपणे मांडली आणि रसिकांच्या हृदयाला हेलावून सोडले.
 
कै. दिलीप भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सादर होणार्‍या या नाटकाची निर्मिती नागपूरच्या ‘मानिनी बहुउद्देशीय संस्थेने ’ केली. रमेश लखमापुरे दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती दीपलक्ष्मी भट यांची होती. घरातील मुले नोकरी-व्यवसायानिमित्ताने घर सोडून जातात, परदेशी स्थायिक होतात आणि घरात फक्त म्हातारे आई-बाप उरतात. मुले व नातवंडांच्या प्रेमाला आसुसलेल्या म्हातार्‍या जोडप्याची भावनिक कुचंबणा या नाटकातील अनेक हृदयस्पर्शी घटनांमधून चित्रित करण्यात आली आहे. सत्तरच्या दशकात अतिशय गाजलेले हे नाटक आजच्या काळातही तेवढेच कालसुसंगत आहे.
 
या प्रयोगात प्रफुल्ल माटेगावकर (नाना) आणि दीपलक्ष्मी भट (नानी), प्रज्‍ज्वल भोयर (दिनू), तन्मय गंधे (म्हाद्या), सत्यम निंबुळकर (विनय भोळे), उमा पाठक, स्वप्निल भोंगाडे (दीक्षित आजोबा), वरुणराज बागुलवार (श्याम) या कलाकारांनी आपल्या भूमिका अतिशय समरसतेने सादर केल्या. स्वप्निल बोहोटे यांचे नेपथ्य, कबीर लखमापुरे यांचे संगीत, लालजी श्रीवास यांची रंगभूषा, रमेश लखमापुरे यांची प्रकाश योजना रसिकांना प्रभावित करणारी ठरली.