...तर विरोधकांकडून मराठा अन् ओबीसी समाजाची दिशाभूल: उमेश पाटील

    16-Jul-2024
Total Views |

umesh patil
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राचे सामाजिक संतुलन राखण्यासाठी, महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होऊ द्यायचा नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी जबाबदारीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि यामध्ये विरोधक आपली भूमिका स्पष्ट करणार नसतील तर याचा अर्थ ते दुटप्पी वागून महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल व फसवणूक करत आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
 
दरम्यान मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याचा कुठला कायदेशीर मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्या हातात तशी संधी असती तर त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले असते का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार, उध्दव ठाकरे आणि नाना पटोले यांना केला आहे.
 
याशिवाय संबंधितांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसंदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे महाराष्ट्रासमोर येऊन सांगितले पाहिजे. तशापध्दतीने आरक्षण देण्याची त्यांची भूमिका असेल तर कोणता कायदेशीर मार्ग त्यांच्याकडे आहे हेही महाराष्ट्राला सांगावे असे आवाहनही उमेश पाटील यांनी केले.
 
राज्यातील सामाजिक संतुलन टिकले पाहिजे यासाठी सरकारने बैठक आयोजित केली होती परंतु विरोधकांनी जाणूनबुजून त्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यांनी बैठकीला हजेरी लावली असती तर सर्व राजकीय पक्षांची काय भूमिका आहे हे समोर आले असते असेही उमेश पाटील म्हणाले.
 
सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी या सरकारला आरक्षणाचा प्रश्न हाताळता आला नाही आमचे मविआचे सरकार आल्यावर प्रश्न मार्गी लावू हे विधान केले. हे विधान गृहीत धरले तर मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसंदर्भात त्यांची भूमिका काय आहे. तशापध्दतीने आरक्षण देण्याची त्यांची भूमिका असेल तर कोणता कायदेशीर मार्ग आहे हे सांगावे असेही उमेश पाटील यांनी आवाहन केले.
 
इंद्रा साहनी यांचा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्यात केंद्रसरकारने घटनात्मक दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशा पध्दतीची मागणी करुन विरोधक हात वर करतील असा जोरदार प्रतिहल्लाही उमेश पाटील यांनी केला.
 
यापूर्वी सर्वपक्षीय बैठक झाली होती त्या बैठकीत सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे बंद खोलीत झालेल्या बैठकीत मागणी वेगळी करायची आणि बाहेर आल्यावर मात्र वेगळया प्रतिक्रिया द्यायच्या याबद्दल उमेश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.