प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ

    16-Jul-2024
Total Views |
- अधिकाधिक शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन
 
Extension of Pradhan Mantri Crop Bima Yojana
(Image Source : Internet/ Representative)
 
अकोला :
खरीप 2024 मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर (www.pmfby.gov.in) थेट ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
 
पीक विमा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा 16 जूनपासून सुरू करण्यात आली होती. त्यानुसार सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती. तथापि, पीक विमा व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे दोन्ही अर्ज सामाईक सुविधा केंद्रांच्या (कॉमन सर्व्हिस सेंटर) माध्यमातून भरावयाचे असल्याने यंत्रणेवरील ताण कमी करणे, तसेच विमा योजनेत सहभागापासून कुणीही शेतकरी वंचित राहू नये यासाठी पीक विमा योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे.
 
राज्यात या योजनेत 95 टक्क्यांपेक्षा जास्त विमा अर्ज हे सामूहिक सुविधा केंद्र (कॉमन सर्विस सेंटर) यांच्या माध्यमातून भरण्यात येतात. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा कमी असणे,त्याचा वेग असणे. त्याचबरोबर शासनाने नव्याने सुरू केलेली 'लाडकी बहीण' या योजनेअंतर्गत अर्ज देखील सामूहिक सुविधा केंद्र (कॉमन सर्विस सेंटर) यांच्या माध्यमातून भरण्यात येतात.
 
अशाप्रकारे पिक विमा व लाडकी बहीण असे दोन्ही अर्ज कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून भरावयाचे असल्याने मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यात खरीप हंगामात एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ज्वारी, तुर, मुग, उडीद, सोयाबीन, कापुस पिकाचा विमा केवळ एक रुपयात काढण्यात येणार आहे.
 
राज्यात 15 जुलै रोजी सकाळी 10 पर्यंत या योजनेअंतर्गत एक कोटी 36 लाख विमा अर्जांद्वारे साधारण 90 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. राज्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र 142 लाख हे आहे. अकोला जिल्ह्यातील 1 लाख 86 हजार 180 शेतक-यांनी अर्ज केले असून, त्यानुसार अपेक्षित संरक्षित क्षेत्र 3 लक्ष 15 हजार 610 हे. आहे. या मुदतवाढीचा लाभ घेऊन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी या योजनेच्या माध्यमातून विमा संरक्षण घ्यावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.