मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा: जिल्हाधिकारी

    16-Jul-2024
Total Views |

CM Youth Work Training Scheme

 
भंडारा :
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ (CM Youth Work Training Scheme) महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
 
या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.
 
कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अंमलबजावणीच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कौशल्य विकास विभाग शासकीय आयटीआय, औद्योगिक संस्था आणि शासकीय विभाग यांची एकत्रितरित्या बैठक घेतली.
 
या योजनेतून शासकीय कार्यालयांना मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे .त्यासाठी लवकरच विभागांनी मनुष्यबळ आवश्यकता जिल्हा प्रशासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास झळके यांना दिले. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उद्योग केंद्राचे हेमंत बदर, यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
 
उमेदवाराची पात्रता
किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदवीका, पदवी, पदव्युत्तर असावी. मात्र, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे आधार नोंदणी असावे. बँक खाते आधार संलग्न असावे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.