डिगडोह वासींनी समाजकार्यात शोधला `विठ्ठल’

    16-Jul-2024
Total Views |
- आषाढी एकादशीला महादिंडीतून देणार सामाजिक कार्याचा संदेश
 
Vitthal
 (Image Source : Internet/ Representative)
 
वाडी :
महाराष्ट्रातील अठरा पगड संतांनी आपापल्या कामात ‘विठ्ठल’ (Vitthal) शोधला. श्रमातूनच विठोबाचा आराधना केली. अनेक संतांनी सावळ्या विठोबाला वर्षातून एकदातरी भेटण्यासाठी पंढरपूरची वारी करुन स्वतःतला आनंद द्विगुणित करुन घेतला. पण गावात राहून शेती करणारा व श्रमाची आराधना करणारा शेतकरी, शेतमजुर यांनी आपापल्या कामाशी जोडून विठ्ठलाशी नाते अबाधित केले. त्याचबरोबर आपला विठ्ठ आपल्याच अवतीभवती असल्याचे सूत्र अनेक संतानी अभंगातून मांडले. संतांच्या या उक्तीला शोभणारे कार्य डिगडोहवासींनी हाती घेतले असून गेल्या चार वर्षांपासून आषाढी एकादशीला महादिंडीचे आयोजन करुन गावातच विठ्ठलभक्तीच्या स्वरुपात सामाजिक, धार्मिक कार्याचा मुहूर्तमेढ केली. या कामी भाजपचे हिंगणा विधानसभा संयोजक सुरेश काळबांडे यांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना माउली गृप व सर्वपक्षियांच्यावतीने साकार केली.
 
नागपूरपासून अवघ्या आठदहा किलोमीटर अंतरावरील एमआयडीसीतील डिगडोह नगरपरिषद परिसरात गेल्या चारपाच वर्षापूर्वी आषाढी एकादशीला महादिंडीची परंपरा सुरु करण्यात आली. या दिंडीत परिसरातील सुमारे चार ते पाच हजार नागरिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होतात. परिसरातील वातावरण या सोहळ्याने अगदी ‘विठ्ठलमय’ होऊन जाते. दिंडीच्या स्वागतासाठी परिसरात ठिकठिकाणी तोरणपताका बांधल्या जातात. दारासमोर रांगोळ्या काढून सजावट केली जाते. दिंडीत परिसरातील शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतात. विविध वेशभूषा सादर केलेले कलावंत सर्वाचे लक्ष वेधून घेतात. या दिंडीच्या आयोजनात सर्व जण राजकारण, भेदभाव विसरुन सहभागी होतात. साईनगरच्या साईमंदिरापासून दिंडीची सुरुवात केली जाते. मंदिरात पूजा अर्चना केल्यानंतर साईनगर, पारधीनगर, बालाजी नगर, दुर्गानगर, रडके ले आऊट आदी भागांतून भ्रमंती केल्यानंतर सुरेश काळबांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या परिसरात सर्व सहभागींना फराळाते वितरण करुन दिंडीचा समारोप होतो.
 
दिंडी माध्यमातून देणार संदेश
 
दिंडीच्या माध्यमातून वारकरी परंपरचे महत्व समजून घेताना पर्यावरणाच्या संवर्धनाचा विद्यार्थी व नागरिकांना संदेश देणे, त्यासाठी वृक्षलागवड करणे, ग्रामस्वच्छता करणे, वॉटर हार्वेस्टिंगचे महत्व नागरिकांचे समजावून सांगणे, सर्व राजकीय भेद बाजूला ठेवून गावाची एकजूट अबाधित ठेवणे यासाठी दिंडीचा सामाजिक, धार्मिक आणि एकंदरीत जीवनमानाच्या जडणघडणीत महत्वाचा हेतू लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दिंडीच्या पूर्वतयारीवर हनुमान मंदिरास आयोजन कमेटीची नुकतीच बैठक पार पडली. त्यात संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस भाजपचे हिंगणा विधानसभा संयोजक सुरेश काळबांडे, माउली गृपचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, उपसभापती उमेशसिंह राजपूत, महेश लोखंडे, काशीनाथ मापारी, एन.आर.सिंग, दीपक सायखेडे, राकेश उमाळे, राम सपकाळ, बी.एन सिंग आदी नागरिक उपस्थित होते.
 
महाराष्ट्रातील संतांनी जसा आपल्या कामाच विठ्ठल शोधला तसा गावाच्या विकासात विठ्ठल शोधण्यासाठी गावातील सर्व बंधू-भगिनी या दिंडीच्या रुपाने एकत्र येऊन गावाच्या विकासात हातभार लावतात. त्यासाठी गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम हाती घेतला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांमध्ये चांगल्या विचाराची निर्मिती होऊन गावाचा विकास साधल्या जावो, असे साकडे विठ्ठलाकडे घातले जाते. दिंडीत विठ्ठलभक्तांची यानिमित्ताने मांदियाळी जमते, त्यातून नवीन सृजनाला दिशा मिळते, असे महादिंडी उपक्रमाँचे आयोजक सुरेश काळबांडे म्हणाले.
 
यात माऊली गृपचे सहकारी, गावकऱ्यांचे सहकार्य आणि सहभाग लाभतो, ही एक चांगली परंपरा निर्माण करण्याचा आमचा हेतू यशस्वी होत आहे. दिंडीच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरणाला उपयोगी व विकासात्मक वातावरणाची निर्मित केली जाते. ‘आमचे गाव सुंदर गाव’ म्हणून नावारूपाला यावे यासाठी भविष्यातही प्रयत्न कायम राहावे, अशी प्रार्थना करतो, डिगडोह येथील माउली गृपचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे म्हणाले.