चिखलदऱ्याच्या एमटीडीसीमध्ये राडा; रॉड, हॉकी स्टीक, दांड्यांनी हल्ला

    16-Jul-2024
Total Views |

- तिवसा येथील युवक जखमी, एक गंभीर
 
Clashes in Chikhaldara MTDC
(Image Source : Internet/ Representative)
 
अचलपूर :
चिखलदरा येथील महाराष्ट्र टुरिझम डेवलपमेंट कार्पोरेशन म्हणजेच एमटीडीसीच्या रिसोर्टमध्ये दारुचे दामदुपटीने पैसे वसूल करत असल्याच्या कारणाहून झालेला वाद हाणामारीपर्यंत गेला. एमटीडीसीच्या कर्मचाऱ्यांसह काही स्थानिकांनी तिवसा येथील पाच ते सहा युवकांना लोखंडी रॉड, हॉकी स्टीक, दांडक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून या युवकासह इतर जखमींना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
जखमी युवक हे तिवसा येथील शिवाजी चौकातील असल्याची माहिती त्यांनी दिली. शेखर (22), निखील (28), साहिल(20), रोशन (21), गणेश(24) असे जखमी युवकांचे नाव आहे. हे युवक रविवारी चिखलदरा येथे पर्यटनाकरिता आले होते. एमटीडीसीच्या रिसॉर्टवर खाण्या पिण्याकरिता बसल्यावर बिलात दामदुप्पट पैसे लावल्याने आढळून आले. याचा या युवकांनी विरोध केला. ज्यानंतर वाद झाला आणि हाणामारी झाली. बातमी लिहेस्तोवर कुणावरही गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते.
 
हे युवक एमटीडीसीमध्ये दारु पिण्याकरिता बसले होते. त्यांचा बिलावरुन वाद झाला. त्यानंतर एमटीडीसीच्या बाहेर हाणामारी झाली. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना मारले. आतापर्यंत तक्रार देण्याकरिता ठाण्यात कुणी आले नाही, अशी माहिती चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद पिदुरकर यांनी दिली.