बडतर्फ पोलिसासह पत्नीवर गुन्हा दाखल

    16-Jul-2024
Total Views |
- पूर्वीही नोंद झालाहे गुन्हा

 A case has been registered against the sacked police(Image Source : Internet/ Representative) 
नागपूर :
स्वस्त किंमतीत सोने मिळवून देण्याच्या बहाण्याने बडतर्फ पोलिस आणि त्याच्या पत्नीने अकोला येथील एका व्यवसायी तरुणाला 28 लाख रुपयांचा चुना लावला. सदर पोलिसांनी आरोपी दाम्पत्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पल्लवी जावळीकर आणि कमलेश जावळीकर रा. पोलिस लाईन टाकळी, असे आरोपी पती-पत्नीचे नाव आहे. विशेष म्हणजे कमलेश विरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. नवीन प्रकरण शुभम जगदीश नेभनानी (27) रा. मूर्तीजापूरच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला आहे.
 
शुभम हा जेसीबीचा व्यवसाय करतो. त्याचा मित्र हिमांशू गुप्ता हा नागपुरात राहतो. 15 डिसेंबरला शुभमचे लग्न ठरले होते. त्यासाठी त्याला सोन्याचे दागिने खरेदी करायचे होते. हिमांशूने त्याला सांगितले की, पल्लवी जावळीकर नावाची त्याची मित्र स्वस्त किंमतीत सोने उपलब्ध करून देते. तिचे शहरातील सराफा व्यवसायिकांशी चांगले संबंध आहेत. लग्नासाठी तो पल्लवीकडून सोने खरेदी करू शकतो. 5 मे रोजी पल्लवीने शुभमला व्हॉट्सॲप कॉल केला आणि सोने खरेदीसाठी नागपूरला बोलावले. 7 मे रोजी शुभम सदरच्या हल्दीरामसमोर पल्लवीला भेटला. पल्लवीने बाजार भावापेक्षा 10 हजार रुपये कमी दराने सोने उपलब्ध करून देण्याची बतावणी केली. शुभमने तिला 60 हजार रुपये दिले आणि काही वेळातच पल्लवीने त्याला सोन्याचा सिक्का उपलब्ध करून दिला.
 
आधी दिले होते बनावट सोने
 
त्यामुळे शुभमचा विश्वास बसला. पल्लवीने त्याला 15 लाख रुपयांहून अधिकचा माल खरेदी करायचा असेल तर ती 50 हजार रुपये प्रति तोळाच्या भावाने सोने उपलब्ध करून देऊ शकते असे सांगितले. काही दिवसांनी शुभम पुन्हा नागपुरात आला. त्याच ठिकाणी पल्लवीची भेट घेतली आणि 18 लाख रुपये दिले. सोने घेऊन काही वेळात परतते, असे सांगून पल्लवी तिच्या एमएच-01/एएच-4205 मध्ये बसून निघून गेली. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने शुभमने तिला फोन केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी पल्लवीने त्याला रहाटे कॉलनी परिसरात बोलावले. त्याला 257 ग्रॅम सोने दिले. शुभमने अकोल्याला पोहोचून तपासले असता सोने बनावट असल्याचे समजले. पल्लवीला जाब विचारला असता तिने चुकीने दुसरा माल दिल्याचे सांगितले. त्यानंतर माल देणाऱ्या व्यावसायिकाला पोलिसांनी पकडल्याचे सांगून लवकरच माल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
 
मार्च महिन्यात सीपींनी केले होते बडतर्फ
 
23 जून रोजी पल्लवीने नुकसान भरपाईसाठी मोठी डील झाल्याचे सांगून आणखी 10 लाख रुपये घेतले. त्याला सोबत कारने शुक्रवारी परिसरात घेऊन गेली. काही वेळातच सोने घेऊन परतते असे सांगून शुभमला कारमध्येच बसून राहण्यास सांगितले. दोन तास होऊनही ती परतली नाही. दरम्यान अचानकच कमलेश तेथे आला आणि कार त्याची असल्याचे सांगितले. शुभमला कारमधून उतरवले आणि वाहन घेऊन गेला. शुभम रात्री उशिरा पल्लवीच्या घरी पोहोचला असता पती-पत्नी सोबत दिसले. तेव्हा शुभमला समजले की, दोघांनीही मिळून त्याची फसवणूक केली आहे. त्याने प्रकरणाची तक्रार सदर पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. कमलेशने यापूर्वी सुरेंद्र कोठारी नावाच्या व्यावसायिकाला भूखंड विक्रीच्या नावावर फसवले आहे. तो सतत कामावरून गैरहजर रहात होता. मार्च महिन्यात पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी त्याला सेवेतून बडतर्फ केले होते. त्यानंतरही कमलेश पोलिस क्वॉर्टरमध्ये राहतो हे आश्चर्यकारकच आहे.