नागपुरात सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली १८ लाखांचा फसवणूक

    16-Jul-2024
Total Views |

18 lakh fraud in the name of government job in Nagpur
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एका शिक्षकाला व त्याच्या नातेवाईकांना एका आरोपीने १८ लाखांनी फसविल्याची माहिती समोर आली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपी फरार झाला आहे. दीपक श्रावण शेंद्रे (४९, रुक्मिणीनगगर, नवीन सुभेदार ले आऊट) असे फरार आरोपीचे नाव आहे.
 
माहितीनुसार, नंदकिशोर रेवतकर (३९, श्रीकृष्णनगर) यांची जानेवारी २०२० मध्ये दीपक यांच्याशी ओळख झाली. दीपकने नंदकिशोरला सरकारी कार्यालयात ओळखी असून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.
 
नागपूर व गोंदिया येथे आरोग्य विभागात प्रत्येकी दोन जागा रिक्त असून १० लाख रुपयांत काम होईल असा दावा त्याने केला. त्याने पाच लाख रुपये ॲडव्हान्स लागतील असे देखील सांगितले. नंदकिशोर यांचा त्याच्यावर विश्वास बसला व नातेवाईकांना नोकरी लावून देण्याबाबत दीपकसोबत बोलणे केले. आरोपीने त्यांना १५ दिवसांत मुलाखत पत्र देतो असे सांगून १८ लाख रुपये घेतले. मात्र त्याने कुठलेही पत्र दिले नाही. नंदकिशोर यांनी चौकशी केली असता आरोग्य विभागात कुठलीही जागा नसून जाहीरातदेखील निघाली नसल्याचे कळाले. त्यांनी आरोपीला पैसे परत मागितले. त्याने कोरोनाचे कारण समोर करून टाळाटाळ केली. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याने नंदकिशोर यांना धनादेश दिले. मात्र ते वटलेच नाही. त्यानंतर आरोपी घर सोडून निघून गेला. तेव्हापासून तो गायब आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नंदकिशोर यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.