मुंबई :
'मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस...' म्हणत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस आता तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.
'राष्ट्रगीत' आणि 'महाराष्ट्र माझा' गाण्यानंतर शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वित्त मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, चिराग पासवान, शिवराजसिंह चौहान, रामदास आठवले, पियूष गोयल, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, डॉ. प्रमोद सामंत इत्यादी एनडीए नेते प्रामुख्याने उपस्थित आहेत. या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे राज्यभरातील समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते. सिनेसृष्टीमधील दिग्गजांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.
शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आई सरिता फडणवीस यांचा आशीर्वाद घेतला. यावेळचे क्षण त्यांची आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. 'मायेचे औक्षण! आईच्या आशीर्वादाने नव्या पर्वाचा आरंभ' असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.