बिश्नोईच्या धमक्यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ; घेतली बुलेटप्रुफ कार

    19-Oct-2024
Total Views |
Salman Khan
 (Image Source : Internet)
मुंबई :
एनसीपी अजित पवार गटातील नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मुख्य म्हणजे, काळवीट शिकार प्रकरणातील कथित सहभागामुळे सलमान खान सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना त्याच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने दाखल घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सलमान खानने आता स्वतःसाठी 2 कोटी रुपयांची बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने दुबईहून मागवण्यात आल्याचे वृत्त आहे.
 
सलमान खानने सुरक्षेच्या दृष्टीने खरेदी केलेली बुलेटप्रूफ एसयूव्ही कार ही पेट्रोल व्हर्जनची कार आहे. ही कार भारतात उपलब्ध नसल्यामुळे सलमानने परदेशातून विकत घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारमध्ये गोळीबाराच्या दृष्टीकोनातून स्फोटक अलर्ट इंडिकेटर आणि मजबूत काच बसवण्यात आले आहे. तसेच ड्रायव्हर किंवा प्रवाशाची ओळख होऊ नये म्हणून ब्लॅक काच लावण्यात आले आहेत, जेणेकरून वाहन चालक आणि वाहनात बसलेल्या व्यक्तीला पाहता येणार नाही.
 
सध्या सलमान खान बिग बॉससाठी वीकेंड स्पेशल, वीकेंड का वार या भागाचे सूत्रसंचालन करत आहे. मात्र, धमक्या मिळाल्यानंतर अधिक सुरक्षेसह त्याने सेटवर येत शुटिंग सुरु केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या सेटवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बिग बॉसच्या परिसरातील सुरक्षेसाठी 60 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कंपाऊंडमध्ये प्रवेशदेखील प्रतिबंधित करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला कंपाऊंडमध्ये प्रवेश देण्यापूर्वी आधार कार्ड तपासण्यास सांगण्यात येत आहे.