(Image Source : Internet)
नागपूर :
गणेशोत्सव हा सगळ्यांचा आवडता सण आहे. कुठलाही सण गोड पदार्थाशिवाय पूर्ण होत नाही. अशात गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मोदक. बाजारात जरी विविध प्रकारचे मोदक उपलब्ध असले तरी घरी बनवलेल्या मोदकांची चव वेगळीच असते. त्यात उकडीचे मोदक बाप्पाला सर्वाधिक प्रिय आहे, असे म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया उकळीचे मोदक कसे बनवावे.
उकळीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
सारणासाठी -
तूप १ चमचा,
आवडीनुसार बारीक केलेले काजू, बदाम, पिस्ता,
खसखस,
नारळाचा चव,
गुळ १ काप,
वेलची पूड,
जायफळाची पूड
उकडीसाठी -
पाणी १/२ वाटी,
दूध १/२ वाटी,
मीठ चिमूटभर,
तूप,
तांदळाचे पीठ १ वाटी.
सारण तयार करण्याची पद्धत:
सर्वप्रथम एका कढईत तूप गरम करा. त्यात बारीक केलेले काजू, बदाम, पिस्ता आणि खसखस घालून भाजून घ्या. सुका मेवा आणि खसखस भाजून झाल्यावर त्यात नारळाचा चव घाला. या मिश्रणाला २ मिनिटांपर्यंत परतून घ्या. नारळाचा चव उपलब्ध नसल्यास १ वाटी डेसिकेटेड नारळ घेऊन त्यामध्ये ३ ते ४ चमचे दूध टाकून सुद्धा वापरू शकता. मिश्रण भाजून झाल्यावर त्यामध्ये गुळ घाला. गूळ नीट मिळवल्यानंतर या मिश्रणाला ५ मिनिटे शिजवून घ्या. मिश्रण शिजून झाले की गॅस बंद करा. नंतर सारणाला चांगले चविष्ट बनवण्यासाठी त्यात वेलीची पूड आणि जायफळाची पूड घालून एकत्र मिसळून घ्या.
उकड तयार करण्याची पद्धत:
पुन्हा एका कढईमध्ये पाणी आणि दूध एकत्र करून गरम करा. त्याला चांगली उकळ येउ द्या. पाणी आणि दुधाला उकळ आली की त्यात मीठ आणि तूप घाला. यानंतर त्यात हळूहळू तांदळाचे पीठ घाला. गॅसची आंच कमी करून पीठ व्यवस्थित हलवून घ्या. यात गुठळे येऊ नये याची काळजी घ्या. आता कढईला ५ मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा आणि १५ मिनिटे पीठ तसेच असू द्या. १५ मिनिटांनी ही उकड एका ताटात काढा. आता या उकडील नीट मळून घ्या. उकड मळत असताना यात पाण्याचा वापर करू नये. आता या पिठाचे छोटे-छोटे गोळे करून घ्या. एक वाटी तांदळाच्या पिठात ७ ते ८ मोदक तयार होतात.
मोदक कसे तयार करायचे
उकडीचा एक गोळा हातात घेऊन त्याची पातळसर अशी पारी तयार करा. आता बोटांच्या मदतीने परीला व्यवस्थित कळ्या तयार करा. यामध्ये सारण भरून मोदक तयार करा. मोदक वाफवून घ्या. अगोदर त्यावर केशराचे दूध टाका. आता १५ मिनिटांसाठी चाळणी किंवा मोदक पत्रात ठेवून मोदक वाफवून घ्या. तयार झालेले गरमागरम, गोडसर आणि लुसलुशीत असे मोदक साजूक तुपासह ताटात काढून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.