(Image Source : Internet)
नागपूर :
आजपासून गणेशेत्सवाला सुरुवात झाली आहे. घराघरात आज आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे. त्यामुळे आजपासून बाप्पासाठी विविध प्रकारचे नैवेद्य बनवण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या दहाही दिवशी गणपती बाप्पासाठी दररोज रोज काय नवीन नैवेद्य बनवायचा, हा सर्वच गृहिणींसाठी कठीण प्रश्न आहे. नैवेद्य जरी बाप्पासाठी असला तरी मज्जा मात्र घरातल्या सर्व कुटुंबीयांची असते. अशात घरातील सर्वांच्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले जाणारे मोदक चविष्ट, शुगरफ्री आणि पौष्टिक कसे तयार करायचे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.चला तर मग बघूया झटपट स्वादिष्ट आणि पौष्टिक खजुराचे मोदक कसे तयार करायचे.
लागणारे साहित्य:
खजूर - १ वाटी,
बारीक चिरलेले बदाम, काजू, मनुका, अक्रोड, पिस्ता - २ वाटी,
तूप - पाव वाटी
कृती :
बाजारात २ प्रकारचे खजूर उपलब्ध असतात. एक कडक तर दुसरे मऊसर आणि मगजदार खजूर असतात. मोदक तयार करण्यासाठी आपल्याला मऊसर खजुराचा वापर करायचा आहे. आता मोदक तयार करताना सर्वप्रथम खजुराच्या बिया काढून वेगळ्या करा. आता खजुराला हातानेच थोडं दाबून घ्या. यानंतर सुक्या मेव्याचे काप करणे कठीण जात असेल तर तुम्ही ते मिक्सरमधून जाडसर फिरवून घेऊ शकता. मात्र, मिक्सरमधून फिरवताना सुक्या मेव्याची बारीक पावडर होऊ देऊ नका. कारण मोदक खाताना दाताखाली येणाऱ्या सुक्या मेव्याच्या दाण्यांची चव वेगळीच लागते. आता खजूर आणि तयार केलेला सुका मेवा एका बाऊलमध्ये एकत्र करा. यात तूप घालून घ्या. आता एकत्र तयार झालेल्या मिश्रणाला हाताने व्यवस्थित मळून घ्या. मिश्रण एकजीव करताना गरज वाटल्यास अजून थोडे तूप घालता येईल. आता या सारणाचे छोटे छोटे मोदक तयार करा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा. अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने गॅसचा वापर न करता, साखर किंवा गुळाचा वापर करता पौष्टिक आणि चविष्ट मोदक तयार आहेत. हे मोदक सहज ७ ते ८ दिवस सहज टिकतात.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.