- जिल्हा परिषदेची शेतकऱ्यांसाठी उपाययोजना जारी
नागपूर : जनावरांची योग्य शुश्रूषा करून लम्पी आजारापासून त्यांना दूर ठेवणे शक्य आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून पशुधनाचे रक्षण करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज येथे केले आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत या संदर्भातील उपाययोजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी त्याचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
पशुधनाच्या त्वचारोगावर 80 टक्के योग्य देखभाल व 20 टक्के औषधोपचाराचा माध्यमातून या आजारावर मात करता येऊ शकते. आजारी जनावरांना हिरवा,मऊ व लुसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीचा प्रथिने व ऊर्जा युक्त खुराक द्यावा. पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात वारंवार उपलब्ध करून द्यावे. पाण्यामध्ये मीठ व गूळ टाकून दिल्यास जनावर पाणी आवडीने पितात. त्यातून खनिज क्षार व ऊर्जा मिळते.
माने जवळ जखम असलेल्या जनावरांना चारा व पाणी तोंडांच्या उंची जवळ उपलब्ध करून द्यावा. पशुसंवर्धन विभागाने सुचविल्याप्रमाणे चारा कमी खाणाऱ्या जनावरांना ऊर्जावर्धक औषधे तोंडावाटे देण्यात यावीत. सध्या पावसाळा सुरू असल्याने त्यांना उबदार निवारा उपलब्ध करून द्यावा. गोठा कोरडा राहील, गोठ्यामध्ये कोणत्याच परिस्थितीत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांची उन्हामध्ये गरम पाण्याने आंघोळ घालावी, अंग कापडाने कोरडे करावे, म्हणजे सर्दी होणार नाही, लहान वासरांना चेहऱ्यावरील दुखऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करणे अवघड झाल्याने दूध पिता येत नाही. त्यासाठी चेहऱ्यावर गरम पाण्याने दिवसातून दोन वेळा शेक द्यावा. बसून राहणाऱ्या जनावरांना सिमेंट काँक्रेटची जमीन देऊ नये, त्यांच्या अंगाखाली मऊ गवत व तत्सम गादी तयार करण्यात यावी. आजारी बैलांना ठणठणीत होईपर्यंत कामाला लावू नये. जखमांवर पशुसंवर्धन अधिकाऱ्याने दिलेले द्रावण लावावे. जखमांवर अळ्या पडल्या असल्यास हायड्रोजन पेरीक्साइडचा वापर करून अशा जखमांना उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घ्यावा.
जनावरांवर माशा बसणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, वेळोवेळी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच आजारी जनावरांसंदर्भात माहिती देत राहावी, असे आवाहनही जिल्हा परिषदेने आज जारी केलेल्या उपाययोजनांमध्ये केले आहे.