- कावीळ आजारांपासून काळजी घ्या
- मनपाच्या साथरोग अधिकाऱ्याचे आवाहन
नागपूर : पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणी काही कारणानी दूषित झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो, डिसेंट्री अशा आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थावर माश्या बसून ते दूषित झााल्यास उलटया, जुलाब, कावीळ अशा प्रकारचे आजार होतात. सर्वसाधारण पणे पावसाळ्यामध्ये अशा आजाराचे प्रमाण वाढते. म्हणून नागरिकांनी याबाबत खबरदारी बाळगत दूषित पाणी व अन्न पदार्थांपासून उद्भवणाऱ्या आजारांपासून काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.
मनपाचे नोडल वैद्यकिय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले की, सध्या शहरात जलजन्य आजार नियंत्रणात असले तरी तुरळक प्रमाणात विषमज्वर, डायरिया, डिसेंट्री, कॉलरा व कावीळचे रुग्ण आढळून येत आहे. यात कावीळ हा विषाणूमुळे होणारा आजार आहे, कावीळ दूषित पाणी व अन्न पदार्थ याद्वारे पसरते, कावीळाची कालावधी अर्थात शरीरात विषाणू शिरल्यापासून लक्षणे दिसू लागेपर्यंतचा काळ जवळपास 15 ते 60 दिवस आहे.
पिवळे डोळे, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, ताप, उलटी, पोटात उजव्या बाजूस दूखणे ही कावीळची लक्षणे आहे. कावीळवरील निदान व उपचाराची मोफत सुविधा मनपाच्या सर्व आरोग्य संस्था व शासकिय रुग्णालयात उपलब्ध आहे.
कावीळ होऊ नये म्हणून नागरिकांनी पाणी उकळून गार केलेले पाणी प्यावे (पाण्याला उकळी फुटल्यानंतर ते कमीत कमी 10 मिनिटे उकळू घ्यावे), शौचावरुन आल्यावर, बाळाची शी शू धुतल्यानंतर, स्वयंपाक करण्यापूर्वी, जेवणापूर्वी हात साबण व स्वच्छ पाण्याचे धुवावे, फळे व पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्या, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये. नीट शिजलेले व गरम अन्न प्राशन करावे, शौचाला उघड्यावर बसू नये. तयार अन्न व्यवस्थित झाकून ठेवावे. त्यावर माशा बसणार नाहीत यांची काळजी घ्यावी.
जलजन्य आजार प्रतीबंध व नियंत्रण उपाययोजनेअर्तंगत जलजन्य विषाणुपासुन होणाऱ्या कावीळ आजारी रुग्णाच्या निवासी परीसरात कावीळ सदृष्य लक्षणे असलेल्या रुग्णाची शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. या सोबतच लोकाशिक्षण व जनजागृतीद्वारे कावीळ प्रतीबंध उपाययोजनची माहिती देण्यात येत आहे. रुग्णाच्या निवासी परिसारातील जलस्त्रोताचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात येत आहे. दुषीत जलस्त्रोताबाबत तत्काळ उपाययोजना करुन जनतेला शुद्ध पाण्याला आवडीत पुरवठा होईल, याबाबत काळजी घेण्यात येत असल्याचेही मनपाचे नोडल वैद्यकिय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले.
कावीळ झाल्यास घ्यावयाची काळजी
- भरपूर विश्रांती हा कावीळीवरील एक महत्वाचा उपचार आहे.
- कावीळ झाल्यास आहारात पिष्ठमय पदार्थ (चपाती, भाकरी, बटाटा इ.) अधिक असावे. तेलकट, तूपकट पदार्थ वर्ज्य करा. कावीळीत ग्लुकोज व फळे घेणे उपयुक्त ठरते.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.
- भोंदु वैद्य/बुवा यांच्या नादी लागू नका.
- कावीळ (ई) हा आजार गरोदर स्त्रियांमध्ये गंभीर स्वरुप धारण करतो. म्हणून गरोदर स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी.
- योग्य ती काळजी, योग्य आहार, विश्रांती घेतल्यामुळे बहुसंख्या रुग्णामधील कावीळ आजार 4-6 आठवड्यात आपोआप बरा होतो.