कोंकणातल्या दिवेआगर पासून हा आमच्या करिता नविन मार्ग होता. ऐतिहासिक अशा अभेद्य जलदुर्ग असलेल्या जंजिर्याच्या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. कारण हे येथील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. तसे बघितले तर मुरुड, दंडा, राजपुरी व दिघी येथून सुद्धा जंजिर्याला जाता येते.
दिवेआगर पासून केवळ १६ किलोमीटरवर असलेले 'दिघी' हे नैसर्गिक गाव आणि या गावात असलेली समुद्रावरची 'जेट्टी' म्हणजे फेरी बोटचे पाण्यातले रमणीय स्टेशनच. येथून सुरू होतो शानदार ‘दिघी क्वीन’ या बोटीमधून जंजिर्याचा एका तासाचा निळ्याशार पाण्यातला विलोभनीय समुद्री प्रवास. या जेट्टी वर ‘दर्शन लॉन्च’ व फेरीबोटची सेवा आगरदांडा गावात वाहने नेण्याकरिता सतत उपलब्ध असते. हा परिसर अत्यंत स्वच्छ असून फारशी अशी गर्दी या मार्गावर नसतेच. त्यामुळे अतिशय शांत पणे मनसोक्त समुद्र पर्यटनाचा आनंद दिघी पासून घेता येतो. येथे लहानसे स्वच्छ उपहारगृह पण आहे.
जवळपास एका तासात आम्हाला मजबूत असा अंगदा सारखा पाय रोवून बसलेला काळाकभिन्न जंजिरा दुरून दिसायला लागला. विलोभनीय बुरूजांचे दर्शन झाले. शिडाच्या लहान होड्यामधून किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि भव्य अशा मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला आणि येथे दिसायला लागला समुद्रातला एक अज्ञात प्राचीन इतिहास.
सहजच मनात विचार आला समुद्रातल्या या २२ एकरच्या बेटावर हा अभेद्य किल्ला कसा बांधला असेल? पायर्यांवरून वर अनेक बुरूजांकडे जाताना ही वाट झाडाझुडपातून खालीवर व वेडीवाकडी जाते. प्रत्येक बुरूजाचे सौंदर्य अनोखे आहे. इथल्या पायरीच्या प्रत्येक दगडाच्या इतिहासाच्या पाऊलखुणा दडलेल्या आहेत.उध्वस्त कमानी आपल्या शौर्याच्या गाथा सांगत आहे. येथला जीर्ण झालेला पडित महाल आपल्या कर्मावर आसवे गाळीत आहे. येथील ३०० वर्षापूर्वीच्या तोफांचा श्रीमंत इतिहास अज्ञात काळात लुप्त झालेला आहे. तरीही कलाल बांगडी, लांडाकासमव चावरी या तोफा आपल्या किल्ल्याचा प्राचीन इतिहास सांगायला आसुसलेल्या असतात.
जंजिरा हा शब्द 'जझीरा' या अरबी भाषेतून आलेला आहे. याचा अर्थ ‘बेट’ अथवा समुद्रावरचे ‘बंदर’असा आहे. समुद्रावरच्या या खुल्या बेटाजवळ असलेल्या 'राजपूर' या गावाला कोळ्यांची मोठी वस्ती होती. साहजिकच मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. परंतु, त्या काळात समुद्री चाचे म्हणजे लुटारूंच्या टोळ्या या कोळी समाजाला या खुल्या बेटावरून खूप त्रास द्यायचा. त्यांचा उपद्रव व्हायचा व आक्रमण करून माल लुटून न्यायचे. या चाच्यांना प्रतिबंध करण्याकरिता अहमदनगर सल्तनतच्या निजामाच्या ठाणेदाराची परवानगी घेऊन राजा रामराव पाटील या राजपूरच्या कोळ्याच्या नायकाने या बेटावर लाकडी ओंडक्यांची तटबंदी १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात उभारली. या लाकडी तटबंदीला ला मेढेकोट म्हणत. मग शांतपणे जीवन जगण्याकरिता कोळी लोक येथे राहायला आलेत. या कोळ्यांच्या राजा रामराव पाटलाला 'जंजिर्याचा राजा' म्हणायचे. मग हे पुर्णपणे सुरक्षित बेट ताब्यात आल्या नंतर हा राम पाटील त्या ठाणेदाराला जुमेनासा झाला.
राम पाटलाचा बंदोबस्त करण्याकरिता मग पिरमखान याची नियुक्ती ठाणेदाराने केली. चतुर पिरमखानने दारूचे व्यापारी म्हणून आपली गलबते या बेटा भोवती खाडीत नांगरली व राम पाटील सोबत जवळीक साधण्याकरिता काही दारूची पिंपे भेट म्हणून पाठवली व रात्रभर थांबून मेढेकोट बघण्याची इच्छा प्रगट केली. राम पाटलाने ही परवानगी दिली. आनंदी झालेल्या पिरमखानाने राम पाटलाकरिता धन्यवाद समारोहाचे आयोजन केले व सर्वांना ती दारूपाजली व सारे नशेत झिंगले. संधी साधून पिरमखानने अनेक होड्यांमधून आलेल्या सहकार्यांच्या सहाय्याने या बेटावर आक्रमण केले व हे जंजिरा बेट ताब्यात घेतले व राम पाटलासह रात्रीच्या भयाण अंधारात या समुद्री बेटावर सर्वांची कत्तल केली व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतले.
पिरमखानची कारकीर्द १५२६ ते १५३२ पर्यंत होती व तो १५३२ ला मरण पावला. कालांतराने बुरहाणखानची नियुक्ती झाली. पण लाकडी मेढेकोट पाण्याने झिजत असल्याचे बघून भक्कम मजबूत दगडी कोट बांधण्याची परवानगी बुरहानखानने निजामाकडुन मिळवली. १५६७ ते १५७१ ला हा आताचा दगडी कोट बांधल्या गेला याला 'किल्ले मेहरुब' म्हणायचे. अशा प्रकारे हा जंजिरा किल्ला तयार झाला. या सार्या घटना इ.स.१६१७ च्या म्हणजे भारतात सिद्धीचे आगमन होण्याचा अगोदरच्या आहेत.
१६१७ ला सिद्धीचे भारतात आगमन झाले. शिवाजी महाराजांचा जन्म १६३० ला झालेला आहे. आताचे जे संपूर्ण दगडी कोटाचे बांधकाम आपल्याला दिसते ते बुरहानखानने बांधलेले आहे. या जंजिर्यावर मग इ.स. १६१७ पासून सिद्धी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद जहागिरी प्राप्त केली. सिद्दी अंबर हा जंजिरा संस्थांचा मूळ पुरुष समजल्या जातो. सिद्धी हा समाज भारतातला नाही, तर आफ्रिकेतल्या अबिसीनिया प्रांतातला असून हे लोक शरीराने दणकट मजबूत, काटक व शूर दर्यावर्दी होते. सतत पाण्यासोबत खेळणारे होते. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हा बुलंद जंजिरा किल्ला लढवून ३३० वर्षांपर्यंत अजिंक्य व अभेद्य ठेवला. शेवटी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी मिळून हा जंजिरा जिंकण्याकरिता येथून ४-५ किलोमीटरवर समुद्रातच 'पद्मदुर्ग' (कासा फोर्ट) हा किल्ला सुद्धा बांधला. पण जंजिरा जिंकता आला नाही. या भिंतीची ऊंची ४० फुटांपेक्षा जास्त असून याला १९ कमानी आहेत.
बरेचवेळा कमानीतून वाकून जावे लागते. या किल्ल्याच्या आतमध्ये अनेक उध्वस्त जर्जर झालेल्या अनेक इमारती, मशिदी, राजवाडा, राण्यांचे स्नानगृह, पाणीपुरवठा करणारे प्राचीन स्त्रोत, गोड पाण्याची विहीर, दोन मोठे षटकोनी तलाव, चार मोठे हौद, ‘सदर’ या लहान किल्ल्यावरचा तिरंगा हे सर्व आजही बघायला मिळते... प्रवेश द्वाराजवळच एका वाघाने पाच हत्तींना पायाखाली चिरडल्याचे पराक्रमी इशारा देणारे दगडी शिल्प, पहारेकर्यांची देवडी, घोड्यांच्या पागा, जहाज नांगर, पीर पंचायतन व सुरूलखानचा श्रीमंती भोगलेला उघड्या खिडक्या असलेला ३ मजली उध्वस्त पडका वाडा बघायला मिळतो. याची आज संपूर्ण पडझड झालेली आहे, पण इतिहासाच्या खाणाखुणा अजूनही शाबूत आहेत.
शहा बाबाचा मकबरासुद्धा येथे बघायला मिळतो. या किल्ल्यात पूर्वी एकूण ३ वस्त्या होत्या. त्या पैकी दोन वस्त्या मुसलमानांच्या व एक वस्ती सर्व धर्माच्या समाजाची होती, पण राजाश्रय संपल्यावर या वस्त्या उठवण्यात आल्यात. दगडी कोटाला लागूनच सर्व पायर्या असून येथल्या कमानीतून संभाजी महाराजांच्या समुद्रातल्या ‘पद्मदुर्ग’ या किल्ल्याचे धुरसट दर्शन होते. संकटकाळच्या पश्चिम दिशेला असणार्या दरवाज्याला ‘दर्या दरवाजा’ म्हणतात. पूर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेल्या या किल्ल्यांवर एकूण एकवीस सिद्धीने राज्य केले व १६१७ ते १९४७ पर्यंत म्हणजे ३३० वर्षे हा बुलंद किल्ला अभेद्य ठेवला, अजिंक्य ठेवला. ३ एप्रिल १९४८ ला हा किल्ला म्हणजे जंजिरा संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले. आज या किल्ल्याला ४०४ वर्षे पूर्ण होत आहेत.
समुद्रसपाटीपासून ९० फुट उंच व २० फुट खोल पाया असलेला हा किल्ला बांधायला सिद्धी जौहरला संपूर्ण २२ वर्षे लागली व संरक्षणाकरिता बावीस एकरात ५१४ बुरुजांसह बावीस सुरक्षा चौक्या उभारल्या व या आताही बघायला मिळतात. या किल्ल्याच्या बांधकामात सिद्धी जौहरची प्रमुख भूमिका राहिलेली आहे. ब्रिटिश, पोर्तुगाल, इंग्रज, मुघल, मराठा व अनेकांना हा किल्ला कधीच जिंकता आला नाही हे या किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे...!
ही समुद्रातली एक ऐतिहासिक आनंद यात्रा आहे. ५१४ तोफा, १०० फुटाच्या अंतरावर असलेल्या अनेक बुरूज, असंख्य कमानी, जागोजागी झाडाझुडपातल्या अनेक पायर्या... तलाव, इमारती अशी ही प्राचीन जंजिर्याची गर्भश्रीमंती. काळाच्या ओघात अनेक पाऊलखुणा उध्वस्त झालेल्या दिसतात.
राजा रामराव पाटील हा जंजिर्याचा 'पहिला राजा' तर सिद्धी अंबर' हा जंजिर्याचा पहिला सिद्धी वंशजांचा मूळ पुरुष. भारतीय गणराज्यात जंजिरा संस्थान विलीन होत असताना शेवटचा म्हणजे एकविसावा सिद्धी होता 'मुहम्मदखान'. सिद्धी वंशजांनी हा बुलंद ‘जंजिरा जलदुर्ग’ शेवट पर्यंत म्हणजे ३३० वर्षांपर्यंत अजिंक्य व अभेद्य ठेवला. एकेका अज्ञात स्थळांचा कसकसा इतिहास असतो हे बघून मन सुन्न झाले...!
असा हा समुद्रातला अजेय जलदुर्ग...! एकवीस सिद्धींचा बुलंद जंजिरा..!
श्रीकांत पवनीकर
पर्यटन लेखक
९४२३६८३२५०
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.