ओमिक्रॉन विशिष्ट स्वदेशी MRNA आधारित बूस्टर लस विकसित

    20-Jun-2023
Total Views |

Bosster Dose - Abhijeet Bharat
नवी दिल्ली : स्वदेशी तंत्रज्ञान असलेली mRNA आधारित ओमिक्रॉन प्रतिबंधक वर्धक लस विकसित करण्यात आली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT) आज याची घोषणा केली. जिनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडने याची निर्मिती केली आहे.
 
जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यता परिषदेद्वारे (BIRAC) राबवण्यात आलेल्या मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत या उपक्रमाला सहकार्य करण्यात आले आहे. आणीबाणीच्या स्थितीत याचा उपयोग करण्याची (EUA) परवानगी भारतीय औषध नियामक (DCGI) कार्यालयाने दिली आहे.
 
जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT) जिनोवाच्या mRNA-आधारित पुढल्या पिढीतील लस निर्मिती करण्यास मदत केली आहे. यात, वुहानमधून आलेल्या या विषाणू विरूद्ध mRNA-आधारित लसीचा मूळ नमूना विकसित केला गेला. याच्या संकल्पनेच्या पुराव्यापासून ते पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीपर्यंत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या प्रकल्पाला 'मिशन कोविड सुरक्षा' अंतर्गत पुढे पाठबळ देण्यात आले.
 
GEMCOVAC®-OM ही mRNA-आधारित ओमायक्रॉन प्रतिबंधक वर्धक लस आहे. जिनोवाने DBT च्या सहकार्याने स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ती विकसित केली आहे. प्रोटोटाइप लसीप्रमाणेच, GEMCOVAC®-OM ही एक थर्मोस्टेबल लस आहे. त्याला इतर मान्यताप्राप्त mRNA-आधारित लसींप्रमाणे अतिशीतल पायाभूत सुविधा साखळीची आवश्यकता नसते. त्यामुळे ती संपूर्ण भारतात पाठवणे सोपे आहे. केंद्रीय मंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी डीबीटी चमूच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.