पतीला मदत आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द; मुकुल मुकुंद ताम्हणकर झाल्या यशस्वी व्यावसायिका

    16-May-2023
Total Views |

Mukul Mukund Tamhankar
 
 
नागपूर :
आवड संगीताची पण पतीला व्यवसायात मदत आणि आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द असलेल्या मुकुल मुकुंद ताम्हणकर (Mukul Mukund Tamhankar) आज एक यशस्वी व्यावसायिका ठरल्या आहेत. गेल्या ३५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्या आपल्या पतीच्या व्यवसायाला हातभार लावत असून त्यांनी याला एक वेगळी ओळख दिली आहे.
 
मुकुल यांचे पती मुकुंद आधीपासूनच व्यवसाय करत होते. त्यामुळे आपल्या पतीला मदत करण्याची पुरेपूर इच्छा असल्याने त्या देखील लग्नानंतर लगेच व्यवसायात शिरल्या. मुळात संगीताची आवड असलेल्या मुकुल ताम्हणकर या एम संगीत विशारद आहेत. पतीच्या व्यवसायाला प्राधान्य देत यांची देखील व्यावसायिकेची कारकीर्द सुरू झाली. सुरुवातीला मुकुंद ताम्हणकर यांचे वितरण विपणनाचे काम होते. उत्पादने घरात आल्यानंतर मुकुल या त्यांचे वितरण आणि अकाउंटिंगचे काम सांभाळू लागल्या. साठे बिस्कीट, चितळे, दिनशा यांसारख्या कंपन्यांच्या उत्पादनांचे वितरण त्यांनी केले.
 
 
 
पतीच्या व्यवसायासह आपले स्वतःचे देखील एक वेगळे अस्तित्व निर्माण व्हावे, यासाठी मुकुल ताम्हणकर यांनी साई फूड प्रोडक्ट्स हा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. याअंतर्गत त्यांनी पाणीपुरी, चिवडा, शेव, बुंदी, मसाला, भेळ या उत्पादनांच्या व्यवसायाला सुरुवात केली. याशिवाय लोकांच्या मागणीनुसार पुरण पोळी, खवा पोळी, तसेच खिचडी, पोहे, उपमा बनवून देण्याचे ऑर्डर्सही त्यांच्याकडे घेतले जातात. अनेक अडथळे आणि अडचणींचा सामना करत गेल्या ३५ वर्षांपासून मुकुल या यशस्वीरीत्या आपला व्यवसाय सांभाळत आहेत. सध्या त्यांच्याकडे एकूण २२-२४ लोक कामाला आहेत.
 
मुकुल यांच्या पतीचे गेल्या ८ महिन्यांपूर्वी निधन झाले असून पतीचा आणि स्वतःचा असे दोन्ही व्यवसाय त्या सुरळीत सांभाळत आहेत. एखाद्या पुरुषाच्या यशस्वी होण्यामागे एक स्त्री असते, हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. त्याचप्रमाणे मुकुल यांनी त्या एक उत्कृष्ट व्यावसायिका होण्यामागचे श्रेय आपल्या पतीला दिले आहे. त्यांचा पूर्ण आधार असल्यामुळेच आज मी पुढे जाऊ शकले, असे त्या म्हणाल्या. याशिवाय मुलगा आणि सुनेचा देखील पूर्ण सपोर्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मुकुल या आज ६३ वर्षांच्या असून शक्य आहे तोपर्यंत व्यवसाय करायचाच, आणि पुढे जाऊन तो सून आणि मुलाला सुपूर्द करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
 
याशिवाय २००६ मध्ये मुकुल ताम्हणकर यांनी साई टॉप टीप रेस्टोरेंटची सुरुवात केली. त्यांचा मुलगा अभिनंदन ताम्हणकर हे रेस्टोरेंट सांभाळतात. टॉप टिप हा साई फूड प्रोडक्ट्सचा एक ब्रँड आहे, असेही त्यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या उत्पादनांवर कोणताही आळा आला नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊन त्यांनी आपला व्यवसाय सुरळीत सुरु ठेवला.
 
यावेळी मातृ दिनाच्या निमित्ताने मुकुल मुकुंद ताम्हणकर यांनी सर्व महिलांना एक संदेश देखील दिला. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहे, त्यांनी त्या कामात योग्य लक्ष दिल्यास त्या निश्चितच पुढे जाऊ शकतात, असे त्या म्हणाला. तसेच महिलांनी कधीही थांबू नये. पुढे चालत गेलं की आपोआप रस्ता मिळत जातो, असेही त्या म्हणाला. साई टॉप टीप रेस्टोरेंट, साई फूड्स प्रोडक्ट्स आणि साई गजानन एंटरप्राइजेस अशा तीन कंपन्या त्या योग्यरीत्या चालवत आहेत. मुलगा, सून आणि नात असा त्यांचा परिवार आहे.