जागतिक आरोग्य दिनानिमित्त दिल्लीत वॉकेथॉननचे आयोजन

    07-Apr-2023
Total Views |

Walkathon - Abhijeet Bharat
 
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य दिनानिमित्त (World Helath Day) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवी दिल्ली येथे वॉकेथॉनचे आयोजन केले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर डॉ. मनसुख मांडवीय (Dr. Mansukh Mandaviya) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार (Dr. Bharti Pravin Pawar) यांनी या वॉकेथॉनचे नेतृत्व केले. ‘हेल्थ फॉर ऑल’ अर्थात सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेनुसार या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
केवळ संसर्गजन्य आजारांना (NCDs) दूर ठेवणे एवढाच या कार्यक्रमाचा उद्देश नसून मानसिक जडणघडणीवर सकारात्मक प्रभाव राहण्यासाठी आरोग्यदायी सवयींबाबत जागरूकता पसरवणे हा याचा उद्देश होता. वॉकेथॉनला विजय चौकापासून सुरुवात झाली आणि कर्तव्य पथ इथून पुढे सरकत इंडिया गेट मार्गे पुढे निघून निर्माण भवन याठिकाणी वॉकेथॉनची सांगता झाली. उत्तम आरोग्यासाठी चालणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यात साडेतीनशेहून अधिक जण अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. हायपर टेन्शन, मधुमेह मानसिक आजार, कर्करोग यासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांना प्रतिबंध करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे यासाठी आरोग्यदायी आणि सक्रिय जीवनमान राखण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.
 
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ‘वसुधैव कुटुम्बकम’ हेच भारताचे तत्वज्ञान असून या माध्यमातून आपण केवळ स्वतःच्याच नव्हे तर सर्वांच्याच प्रगतीचा विचार करतो असे त्यांनी सांगितले. भारताने आपला कोणताही व्यावसायिक लाभ न पाहता कोविड संकटाच्या काळात गरजू देशांना लसमात्रा आणि वैद्यकीय सहाय्याचा पुरवठा केला तेव्हा हेच तत्वज्ञान प्रकर्षाने निदर्शनास आले असे म्हणाले. प्रत्येक संबंधिताला मदत करण्यात भारत आघाडीवर राहिला आहे आणि याच चैतन्यशील वृत्तीनं भारत आपल्या नागरिकांच्या आणि जगाच्या आरोग्यासाठी कार्यरत आहे असे ते म्हणाले.
 
वॉकेथॉन, योगा किंवा बाकीचे व्यायामप्रकार, आपल्या युवकांनी स्वतःच्या जीवनात ही शारीरिक सक्रियता अत्यंत उत्साहाने अंगी बाणवली आहे या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी भर दिला. सुदृढ व्यक्ती केवळ स्वतःच्या कुटुंबासाठीच नाही तर सर्व समाजासाठी सक्रिय योगदान देतो, यातच 'हेल्थ फॉर ऑल' या संकल्पनेचा उगम झाल्याचे त्या म्हणाल्या. वर्तनात्मक बदल आणि अधिक शारीरिक सक्रियतेला चालना देत फिट इंडिया चळवळीसाठी सन्माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाने या माध्यमातून एक सशक्त पर्याय शोधला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.