(Image Source : Internet/ Representative)
आपण वर्षभर विविध सण साजरे करतो, त्यात दिवाळी या सणाला विशेष महत्व आहे, कारण दिवाळी हा असा एकमेव सण आहे, जो आपण पाच दिवस साजरा करतो. आपल्या देशातच नव्हे तर जगात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, म्हणूनच दिवाळी सणाला सणांचा राजा म्हणतात. दिवाळीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच उत्साहाला उधाण येते म्हणूनच गरीब असो वा श्रीमंत, राज महालात राहणारा असो वा झोपडीत राहणारा प्रत्येक जण दिवाळ सण साजरा करतो.
दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा सण, दिव्यांचा सण. दिवाळीच्या पाच दिवसांच्या काळात आकाश कंदील, पणत्या, नवी खरेदी, नवे कपडे, मिठाई, रांगोळी, फटाके यांची रेलचेल. आताही या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनारूपी महामारीने लोकांना मनासारखी दिवाळी साजरी करता आली नाही सुदैवानं यावर्षी दिवाळीवर कोरोनाचे कोणतेही सावट नसल्याने लोक निर्बंध मुक्त दिवाळी साजरी करत आहेत. त्यामुळेच दिवाळीला यावर्षी अधिक उत्साह आला आहे. यावर्षी महागाई वाढली असली तरी दिवाळीचा उत्साह कमी झाला नाही उलट वाढलाच आहे. हा उत्साह पुढे पण असाच कायम राहणार आहे कारण दिवाळी हा आनंदाचा, प्रसन्नतेचा उत्सव आहे.
दिवाळी म्हणजे आनंदाचा दीपोत्सव !.. बाहेर प्रकाशाचे दिवे पेटवायचे आणि हृदयातून ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करायचे. अंतःकरणात अज्ञानाचा, विषमतेचा, अहंकाराचा अंधार असेल तर तो दूर करायचा. ज्या प्रमाणे पणत्या, आकाशकंदील लावून बाहेरील अंधार दूर करायचा संदेश दिवाळी देते तसेच आपल्या अंतःकरणात असलेल्या अवगुणांचा अंधार दूर करण्याचा संदेश दिवाळी देते. प्रत्येक मनुष्याने शुभचिंतन करून, शुभ विचार मनात आणून, शुभ इच्छा प्रकट करून जीवन प्रगल्भ आणि समृद्ध करावे हाच संदेश दिवाळी देते.
जीवनातून असुरी शक्तीचा पराभव करण्यासाठी दैवी शक्तीचा वापर करावा. मानवाची सर्व धडपड जीवनात सुख आणि आनंद मिळवण्यासाठीच चाललेली असते. दुःख भोगल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही हे तत्वज्ञान म्हणून सांगण्यासाठी ठीक मात्र दुःखाची अनुभूती घेण्यास कोणालाही आवडत नाही. मनुष्य स्वभावातील हा स्थायीभाव ओळखूनच भारतीय संस्कृतीत सणांची निर्मिती केलेली असावी याचे भान ठेवूनच प्रत्येकाने सण साजरे करावेत.
गरीब, दरिद्री, कष्टी, अनाथ असा मोठा दुःखी वर्ग समाजात आहे. आपल्या घरी दिवाळी साजरी करताना त्यांच्याही घरी आनंदाचा एक दिवा लावावा म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंदाची रेषा पसरेल. या दुःखी कष्टी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे. साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे बाहेर अनंत दिवे पाजळून दिवाळी येत नसते. हृदयात प्रेमाच्या, मानवतेच्या पणत्या लावून आनंदाची उधळण करणाऱ्या या सणातून आपल्या जीवनात प्रकाश आणू या! अशी दिवाळी साजरी झाली तरच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली असे म्हणता येईल अन्यथा नाही!..
चला तर आपण दिन दुबळ्यांचे दुःख वाटून घेऊ, मानवतेचा ओलावा देऊ, त्यांच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवू, त्यांच्या जीवनात सौख्य निर्माण करू. आपल्या ताटातील खाणे याला प्रवृती म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातील ओरबडणे याला विकृती म्हणतात तर आपल्या ताटातील दुसऱ्याला देणे याला संस्कृती म्हणतात. चला तर आपण या दिवाळीचा निमित्ताने आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करू.
मानवतेचा दीप लावू या!
शुभ दिवाळी!!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.