भारतीय पोस्टाची सुविधा! परदेशात नातेवाईकांना घेता येणार घरच्या फराळाचा आस्वाद

    07-Nov-2023
Total Views |
 
diwali-celebration-abroad-sending-snacks - Abhijeet Bharat
 
नागपूर : आपल्या भारत देशात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. देशात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. आकाश कंदील, मिठाई, फटाके, नवीन कपडे, नवीन वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या खरेदीसाठी दुकाने फुलून गेली आहेत. यासोबतच ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकच जण वर्षभरापासून दिवाळीच्या फराळाची आतुरतेने वाट बघत असतात. पण घरातील काही सदस्य शिक्षण, नोकरी किंवा अन्य कारणास्तव घरापासून दूर सातासमुद्रापार गेले असतात. अशा आपल्या प्रियजनांपर्यंत आईने बनवलेला दिवाळीचा फराळ पोहोचवणे आता सहज शक्य झाले आहे.
 
दिवाळीनिमित्त घराघरात विविध प्रकारचा आणि चविष्ट असा दिवाळीचा फराळ बनवण्यास सुरुवात झाली आहे. मात्र जे लोक परदेशात आहेत, त्यांना सणासुदीच्या काळात आपल्या घरची आठवण सतावत असते. अशातच भारतीय पोस्टाने नागरिकांसाठी एक खास सुविधा सुरु करत परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत घरची आठवण पोहोचवण्याची सोय अगदी वाजवी दरात उपलब्ध करून दिली आहे.
 
दिवाळी या आनंदाच्या सणात आपल्या परदेशातील प्रियजनांना डाकघरामार्फत दिवाळी फराळ पाठवून त्यांना यात सहभागी करुन घेता येणार आहे. परदेशात गेलेले अनेकांचे नातेवाईक, मित्र परिवार यांना काही कारणास्तव कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरे करणे शक्य होत नाही. परंतु, पोस्टाच्या माध्यमातून आनंद वृद्धींगत करणारा या सणात घरी तयार केलेला फराळ युएसए, कॅनडा, युएई, युके, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, रशिया, आर्यलँड या देशातील प्रियजनांना अत्यंत वाजवी दरात पाठवता येणार असल्याची माहिती नागपूर शहर विभागाच्या वरिष्ठ अधीक्षक रेखा रिजवी आणि वरिष्ठ पोस्टमास्टर नागपूर जीपीओ अनिलकुमार यांनी दिली आहे. तसेच या सुविधेचा लाभ जवळच्या डाकघरांकडे संपर्क करुन जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.