नाटकाच्या विविध शैली अभ्यासण्याची गरज - डॉ. पराग घोंगे

    06-Nov-2023
Total Views |
  • संजय भाकरे फाउंडेशनतर्फे रंगभूमी दिन कार्यक्रम आयोजित
 theatrical-diversity-and-its-importance-parag-ghonge - Abhijeet Bharat
 
नागपूर : सामान्यपणे नाटक हे 'वास्तववादी' आणि 'वास्तववादाच्या विरोधात' अश्या दोन मुख्य शैलीत मोडते. परंतु नाट्यशास्त्राच्या अभ्यास केल्यास त्यातील बहुविध शैली समजतील आणि त्या शैलींचा प्रयोग केल्यास नाटक समृद्ध होईल असे मत ज्येष्ठ नाट्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. पराग घोंगे यांनी सांगितले. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी 5 नोव्‍हेंबर 1843 ला मराठी रंगभूमीवर पहिल्या मराठी नाटकाने सुरुवात केली होती. तो दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. संजय भाकरे फाउंडेशनच्यावतीने आज त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. घोंगे बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रकाश एदलाबादकर, ज्येष्ठ अभिनेते आणि संजय भाकरे फाउंडेशनचे प्रमुख संजय भाकरे आणि मंगेश बावसे उपस्थित होते.
 
नाटकाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करण्याची गरज बोलून दाखविताना डॉ. घोंगे यांनी भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा अनेकदा उल्लेख केला. नाटकाचे थियेटर कसे होते, स्टेज कसे असावे याबद्दल त्यांनी माहिती दिली. डोळ्यांनी करण्याच्या अभिनयाचे ३६ प्रकार आहे. असे बारकावे शिकण्याचा प्रयत्न करावा असे देखील ते म्हणाले. आपण दर वेळी नाटक करताना काही नवीन करतोय का, आपले वाचन वाढते आहे का, एखाद्या दिनाचे औचित्य आपण नवीन काम हाती घ्यायला उपयोगात आणतो का हे महत्वाचे आहे यावर त्यांनी विशेष भर दिला.
 
सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि स्वागत समारंभ झाला. त्यानंतर नरेंद्र इंगळे लिखित विनोदी कथेचे शेखर मंगळमूर्ती यांनी केलेले नाट्यरूपांत 'वाऱ्यावर वरात' चा मुहूर्त करण्यात आला. प्रास्ताविक संजय भाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या संजय भाकरे फाउंडेशनच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश बावसे यांनी केले.
 
सिद्धी मिळावाल तर प्रसिद्धी मिळेल : प्रकाश एदलाबादकर
 
सध्याच्या रंगभूमी कलाकारांना सल्ला देताना प्रकाश एदलाबादकर म्हणाले की, केवळ ग्लॅमरच्या मागे न जाता खरोखर मेहनत करून कला सिद्धी प्रपात केल्यास प्रसिद्धी नक्कीच मिळेल. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना 'नाट्यम भिन्न रूपे' या संस्कृत ओवीच्या माध्यमातून नाटकाचे विविध पैलू समजावून सांगितले. नागपूरच्या रंगभूमीच्या इतिहासाचा आढावा त्यांनी घेतला.