आपल्या देशात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आताही देशात दिवाळीची धामधूम सुरू आहे. वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. सर्वत्र दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू आहे. आकाश कंदील, मिठाई, फटाके, नवीन कपडे, नवीन वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या खरेदीसाठी दुकाने फुलून गेली आहेत. जवळपास दोन वर्ष कोरोनामुळे दिवाळीचा उत्साह कमी होता. आता कोरोनाचे संकट पूर्ण टळले आहे. मागील वर्षापासून निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. यावर्षी मोठ्या धामधुमीत दिवाळी साजरी होत आहे. त्यामुळे उत्साहाला उधाण आले आहे.
दिवाळी म्हटले की फटाके, आकाशकंदील, पणत्या, नवीन कपडे, नवीन वस्तू असे जे समीकरण आहे तसेच दिवाळी म्हणजे दिवाळी अंक असेही एक समीकरण आहे. दिवाळी आली की वाचकांना वेध लागतात ते दिवाळी अंकाचे आणि वाचकांचे पाय आपसूकच दिवाळी अंकाच्या खरेदीसाठी पुस्तकांच्या दुकानाकडे वळतात. महाराष्ट्रात तर दिवाळी अंकांची परंपरा खूप पूर्वीपासून आहे. १९०९ साली पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला होता. त्याचे नाव मनोरंजन असे होते. पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध होऊन आज ११३ वर्ष झाली आहेत.
आपल्या राज्यात दरवर्षी विविध विषयांवरची दर्जेदार दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. महाराष्ट्रात हजाराच्या जवळपास दिवाळी अंक प्रकाशित होतात. दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी मेजवानीच. कला, क्रीडा, राजकारण, अर्थकारण, विनोद, साहित्य, कथा, कांदबरी, कविता, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आहार, व्यंगचित्र अशा वेगवेगळ्या विषयांवरील दिवाळी अंक वाचणे म्हणणे पर्वणीच. अनेक वृत्तपत्रे वाचकांसाठी दिवाळी अंक काढत असतात. फटाके, मिठाई, फराळ यासमवेतच दिवाळी अंक ही सुशिक्षित आणि साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे.
मागील दोन वर्षात संपूर्ण विश्वावर कोरोनारुपी महामारीचे संकट होते. त्याचा परिणाम दिवाळी अंकावर देखील झाला होता. कोरोनामुळे दिवाळी अंकाच्या छपाईला आणि वितरणाला मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे तुलनेने कमी दिवाळी अंक प्रसिद्ध झाली होती. असे असले तरी काही संपादकांनी आणि प्रकाशकांनी आपले अंक ऑनलाइन प्रसिद्ध केले होते. वाचकांना ते विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले होते. काहींनी आपले अंक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिले होते. वाचकांनी त्याची प्रिंट काढून ते वाचले होते. सुदैवाने यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने दिवाळी अंकांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. यावर्षी अनेक प्रकाशकांनी आपले दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. यासोबतच ऑडिओ - व्हिज्युअल दिवाळी अंक ही आहे. वाचक पूर्वीच्याच उत्साहाने दिवाळी अंकाचे स्वागत करीत आहे.
दिवाळी अंक आपल्या साहित्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दिवाळी अंकामुळे वाचन संस्कृती रुजायला खूप मदत झाली आहे. वाचन संस्कृती रुजवण्यात व नव्या पिढीला वाचन संस्कृतीकडे घेऊन जाण्यास दिवाळी अंकाचा मोठा वाटा आहे. यावर्षी आपण आपल्या मित्र परिवारांना, नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा व फराळासोबत दर्जेदार दिवाळी अंक भेट द्यावेत. वाचनाची गोडी वाढवण्यासाठी दिवाळी अंक हा चांगला मार्ग आहे. गोडाधोडाचा फराळासोबतच वाचनाचा हा फराळही दिला तर दिवाळीची गोडी आणखी वाढेल आणि वाचन संस्कृती रुजायलाही मदत होईल.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.