बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी सन्मवयाने कार्य करा; अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

    04-Nov-2023
Total Views |
- लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न

NMC Additional Commissioner Anchal Goyal
 
 
नागपूर :
नागपूर शहर क्षेत्रातील मनपासह सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱ्या बालकांचे सर्व प्रकारचे लसीकरण वेळेवर व्हावे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यादृष्टीने संपूर्ण यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिले.
 
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहामध्ये शुक्रवारी आयोजित टास्क फोर्स समितीच्या बैठकीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, आरसीएच अधिकारी डॉ. वसुंधरा भोयर, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. अतीक खान, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. शीतल वांदिले, डॉ. जयश्री, चन्ने, डॉ. गजानन पवाने, डॉ. विनोद वाघमारे, डॉ. वर्षा देवस्थळे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. चेतन जनवारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. अनुपम मरार, बालविकास प्रकल्प अधिकारी भारती मानकर, दामोधर मानकर, नि.वा. मोहुर्ले, अर्चना घरडे, किरण पवार, सुरेंद्र सरदारे, डॉ. अश्विनी निकम, दीपाली नागरे यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, इतर प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घेत, झोननिहाय लसीकरणाची गती वाढविण्याचे निर्देश दिले. लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करावी. शहरातील विविध खासगी रुग्णालयांमधून देखील जन्म झालेल्या बालकांची संख्या आणि करण्यात आलेल्या लसीकरणाचा आढावा नियमित घेण्याचेही त्यांन निर्देशित केले. लसीकरणाची स्थिती, त्यात येणाऱ्या अडचणी आणि उपाय या संदर्भात कार्यवाही व्हावी यादृष्टीने दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी नियमित टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात येणार असल्याचेही यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितले.
 
शहर हद्दीत असणाऱ्या आंगणवाड्यांमध्ये लसीकरण कार्यक्रम राबवून बालकांचे लसीकरण करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी सुचित केले. आंगणवाडी कर्मचाऱ्यांद्वारे लसीकरणासाठी संपूर्ण सहकार्य अपेक्षित असून याबाबत विभागाने समन्वय साधण्याचे देखील निर्देश त्यांनी दिले. ज्या भागातील बालकांचे लसीकरण बाकी आहे अशा ‘हाय रिस्क’ ठिकाणी सातत्याने लक्ष द्यावे व जनजागृती करावी, शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत, तेथे देखील जाऊन लसीकरण मोहीम राबवावी, असे निर्देश देखील अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले.
 
बैठकीत सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण व्यवस्थेची माहिती सादर केली. आरसीएच अधिकारी डॉ. वसुंधरा भोयर यांनी यापूर्वीच्या बैठकीत देण्यात आलेले निर्देश आणि त्यावरील कार्यवाहीची माहिती सादर केली.