Mahavitaran : सायबर भामट्या पासून सावध रहा! बनावट मेसेजना बळी पडू नका

    03-Nov-2023
Total Views |
 
mahavitaran-issues-warning-against-cyber-scams - Abhijeet Bharat
 
अमरावती : महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाइन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्या पासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
 
महावितरणकडून ग्राहकांना जो एसएमएस पाठविला जातो, त्यामध्ये मेसेज पाठविणाऱ्याच्या नावात स्पष्टपणे MSEDCL असा कंपनीचा उल्लेख असतो. महावितरण कधीही खासगी क्रमांकावरून एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेश पाठवत नाही. महावितरणची बिले ऑनलाइन भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर सुविधा असून लाखो ग्राहक तिचा वापर करत आहेत. पण महावितरण बिलासाठी एखाद्या नंबरवर अधिकाऱ्यास संपर्क साधण्यास सांगत नाही. महावितरण कोणालाही फोनवरून ओटीपी विचारत नाही. सायबर भामट्यांकडून पाठवलेल्या वैयक्तिक नंबरवर ग्राहकाने संपर्क साधला तर त्याला त्याच्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलचा ताबा घेता येईल असे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते किंवा एखादी बनावट लिंक पाठविली जाते. त्याचा वापर करून भामटे ग्राहकाची बँकेविषयीची गोपनीय माहिती चोरतात आणि फसवणूक करतात. ग्राहकांनी ओटीपी शेअर केला नाही तर फसवणूक रोखण्यास मदत होईल. ग्राहकाने वीजबिल थकविले तर त्याचा वीजपुरवठा पूर्वसूचना देऊन खंडित करण्याची महावितरणची नियमित पद्धती आहे.ताबडतोब बिल भरा नाहीतर रात्री वीजपुरवठा खंडित करू, असे धमक्या दिल्यासारखे संदेश महावितरण कधीही पाठवत नाही. महावितरणचे तक्रार नोंदविण्याचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ तसेच १८००-१०२- ३४३५ असे क्रमांक आहेत. त्यावर मोफत फोन करता येतो.