राष्ट्रपती मुर्मू चार दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

    29-Nov-2023
Total Views |
 
president-murmu-maharashtra-tour - Abhijeet Bharat
 
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत त्यांचा हा दौरा असणार आहे. या राष्ट्रपती मुर्मू लोणावळा, खडकवासला, पुणे आणि नागपूर या चार ठिकाणांना भेट देणार आहेत.
 
असा राहील राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा
 
29 नोव्हेंबर रोजी - कैवल्यधाम संस्थेने आपल्या शताब्दी वर्ष सोहळ्याचा एक भाग म्हणून, लोणावळा येथे आयोजित केलेल्या 'शालेय शिक्षण प्रणालीमध्ये योगाचे एकीकरण-विचार प्रकटीकरण' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत आयोजित मेजवानीला त्या उपस्थित राहतील.
 
30 नोव्हेंबर रोजी - राष्ट्रपती खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145 व्या तुकडीच्या पासिंग आऊट परेडचे निरिक्षण करतील. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते आगामी 5 व्या बटालियनच्या इमारतीची पायाभरणीही करण्यात येणार आहे.
 
1 डिसेंबर रोजी - राष्ट्रपती पुण्यात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला ‘प्रेसिडेंटस् कलर’ प्रदान करतील. तसेच त्‍या सशस्त्र सेनेच्या संगणकीय उपचार प्रणाली केंद्र ‘प्रज्ञा’ चे दूरदृश्य प्रणाली मार्फत उद्‌घाटन करतील. याच दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.
 
2 डिसेंबर रोजी - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत.